नागपूर : केंद्रीय पर्यावरण तसेच रेल्वे विभागाने वन्यप्राणी अपघात रोखण्यासाठी सुचवलेल्या काही शिफारशींकडे दुर्लक्ष होत असल्याने बल्लारशा-गोंदिया रेल्वेमार्ग हा वन्य प्राण्यांसाठी भारतातील सर्वाधिक धोकादायक ठरत आहे. रविवारी ‘बिट्टू’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाचा या मार्गावर ब्रह्मपुरी वनक्षेत्रात सिंदेवाही येथे रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली. १९ जानेवारी २०२५ रोजी याच मार्गावर एका वाघाचा मृत्यू झाला होता.

तेलंगणातील कावल ते महाराष्ट्रातील कन्हाळगाव अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प या ‘कॉरिडॉर’ला छेदून हा रेल्वेमार्ग जातो. हाच रेल्वेमार्ग पुढे गोंदिया, जबलपूर आणि बालाघाटपर्यंत जातो. कान्हा-पेंच कॉरिडॉरमधून जाणाऱ्या या मार्गावर मध्यप्रदेशात बालाघाट-नैनपूर मार्गावर शमन उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर वन्यप्राणी अपघाताची संख्या जवळजवळ शून्य आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभाग तसेच रेल्वे विभागाने या मार्गावरील वन्यप्राणी अपघात रोखण्यासाठी २०२५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात काही शिफारशी केल्या होत्या. या शिफारशी अमलात आणण्याऐवजी त्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या मार्गावर सातत्याने वन्यप्राण्यांचे बळी जात आहेत. आतापर्यंत १८ वाघांसह २६ रानगवे आणि १२५ इतर वन्यप्राण्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील जवळपास ५० टक्के रानगवे आणि सांबर याच मार्गावर मृत्युमुखी पडले आहेत.

भारतीय रेल्वे वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने रेल्वे मार्गावर कुंपण घालत आहे. प्रत्यक्षात भुयारी मार्ग, आवाज अडथळे, वीजदिवे अडथळे, रबरयुक्त मॅट्स, इलेक्ट्रोमॅट्स आणि घुसखोरी शोधप्रणाली यासारख्या इतर उपायांकडे दुर्लक्ष केले जात आहे. हत्ती प्रकल्प, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाच्या या शिफारसी तातडीने अमलात आणल्या पाहिजे.- शीतल कोल्हे, रोडकिल्स इंडियाचौकट

उच्च न्यायालयाची नाराजी

रेल्वे विभागाने २०१८ मध्ये देशातील वन्यप्राण्यांसाठी असुरक्षित रेल्वेमार्गांची यादी जाहीर केली होती आणि उपाययोजनेबाबतही शिफारसी केल्या होत्या. यात बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्गाचाही समावेश होता. २०१८ मध्ये हा अहवाल आला. परंतु, अद्याप उपाययोजना केलेल्या नाहीत. सोमवारी याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत रेल्वे विभाग वनविभागाच्या मदतीने या मार्गाची संयुक्त पाहणी करून नवा अहवाल सादर करणार आहे.

तीव्र वळण अन् अपुरा प्रकाश

ब्रम्हपुरी वनक्षेत्रात सिंदेवाहीजवळ रविवारच्या घटनेवेळी रेल्वेची गती ७० किलोमीटर प्रतितास इतकी होती. तीव्र वळणमार्ग असल्याने रेल्वेचा प्रकाश पडला नाही. अवघ्या २० मीटर अंतरावर असताना चालकाला वाघ दिसला. ब्रेक दाबून रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न करेपर्यंत वाघाला धडक बसली होती. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध वाघ ‘जय’ याचा ‘बिट्टू’ हा बछडा होता. दुसरा बछडा ‘श्रीनिवास’ याचाही वीजप्रवाहाने काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला.