नागपूर : गोंदिया रेल्वे मार्गावर लोहार येथे वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक दहा येथे सांबराच्या पिल्लाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बल्लारशाह – गोंदिया रेल्वे मार्ग वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरला.

आठ सप्टेंबरला पहाटे १ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जाणारी चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसने रस्ता ओलांडणाऱ्या सांबाराच्या पिल्लाला धडक दिली व त्या पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. बल्लारशाह – गोंदिया रेल्वे मार्गावर यावर्षी २५ मे रोजी अस्वलाचा, २८ जूनला सांबर व तिच्या गर्भातील पिल्लाचा, ३० ऑगस्टला दोन अस्वलाच्या पिल्लाचा, ५ जुलैला एक रानगवा आणि आज आठ सप्टेंबरला सांबारच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झा. आतापर्यंत एकूण ३तीन अस्वल, तीन सांबर, एक रानगवा असे सात वन्यप्राण्याचा मृत्यू ह्या बल्लारशाह – गोंदिया रेल्वे मार्गावर झाला आहे.

बल्लारशाह- गोंदिया रेल्वे मार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगतच आहे आणि वाघांचा भ्रमणमार्ग सुद्धा आहे. नव्याने घोषित झालेल्या कन्हाळगाव अभयारण्य जवळच आहे. कावल अभयारण्य, उमरेड- कऱ्हांडला अभयारण्यच्या भ्रमण मार्गात हा रेल्वे मार्ग येतो. हाच रेल्वे मार्ग पुढे बालाघाट – नैनपूर मध्यप्रदेश या राज्यातून जातो, पण तिथल्या रेल्वे प्रशासनाने वन्यजीवांसाठी उपाय योजना म्हणून भूयारी मार्ग, उड्डाणपूल बांधले आहेत. मात्र महाराष्ट्रात रेल्वे प्रशासनाकडून वन्यजीवांसाठी उपाय योजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे, आणखी किती वन्यजीवांचे बळी गेल्यावर रेल्वे प्रशासनाला जाग येणार आहे.

असंख्य वन्यजीवांचे बळी ह्या मार्गावर होत असतांना कुठल्याही उपाययोजना का होत नाहीत, वन्यजीवांच्या नावावर मिरवणारे भरपूर मिळतील, पण हा प्रश्न संबंधित रेल्वे प्रशासनाला साधे पत्र सुद्धा लिहिण्याची गरज कुणाला आजवर भासली नाही, मग वन्यजीव वाचणार कसे, वन्यजीव भ्रमणमार्ग वाचणार कसे, पुढच्या पिढ्यांना आपण काय दाखवणार आहोत, बाधित झालेला वन्यजीव भ्रमणमार्गाबद्दल कुणाला संवेदना राहिल्या की नाही, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

आपण विकासाकडे जात आहोत की विनाशाकडे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे, असे मत हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, आज घडलेल्या घटनेनंतर घटनास्थळी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे दिनेश खाटे, अमित देशमुख, अंकित बाकडे, अभिषेक गजभिये, राहील अली व वनविकास महामंडळाचे वनक्षेत्र सहाय्यक खडगी उपस्थित होते.