लोकसत्ता टीम

नागपूर: महाविकास आघाडीच्या सभेला संभाजीनगरमध्ये झालेल्या गर्दीचा भारतीय जनता पक्षाने धसका घेतल्यामुळे नागपूरच्या सभेला मैदानावरुन आता विरोध सुरू केला आहे. हा केवळ राजकीय विरोध असल्याची टीका करत आघाडीची सभा ही दर्शन कॉलनीच्या मैदानावर होणार असल्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले.

संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या सभेला मिळालेला प्रतिसाद बघता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनमत आता शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात होत असताना महाविकास आघाडीच्या विरोधात अपप्रचार सुरू करत मैदानावरुन विरोध केला जात आहे. अशा राजकीय विरोधाला आम्ही जुमानत नाही. नागपूर सुधार प्रन्यासकडून रितसर परवनागी घेण्या आली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी सभा होऊ यासाठी कितीही प्रयत्न केले तर ते मैदान बदलणार नाही. कृष्णा खोपडे यांनी विरोध कल्यामुळे काही फरक पडणार नाही. नागपूरच्या सभेची जबाबदारी काँग्रेसकडे असली तीनही पक्ष मिळून ही सभा होणार आहे आणि लाखोच्या संख्येने यासाठी पूर्व विदर्भातील लोक सभेसाठी येतील. मैदानाची क्षमता आणि सर्व व्यवस्था बघून सभेसाठी जागा निश्चित केली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.