नागपूर : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी असतानाही दरवर्षी मोठ्या प्रमाणात मूर्तींची विक्री केली जाते. मात्र, यावर्षी या मूर्तींची कुठेही विक्री होऊ नये यासाठी अशा मूर्तींना शहराच्या सीमेवरील नाक्यावर रोखले जाणार आहे.

यासाठी महापालिकेद्वारे शहरातील पारंपरिक मूर्तिकार संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींची निर्मिती, विक्री आणि खरेदी यावर पूर्णत: बंदी आहे. अशा मूर्ती शहरात येण्यापासून रोखण्यासाठी केंद्रीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये महापालिका, पोलीस, महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.

हेही वाचा – चंद्रपूर : काँग्रेस खासदाराने भेट दिलेल्या कार्यालयावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच होणार

याशिवाय शहरात मूर्तींची विक्री आणि खरेदी टाळण्यासाठी शहरातदेखील पथक धडक कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक झोनमध्ये मूर्तिकारांची नोंदणी केली जाईल. नोंदणीसाठी मूर्तिकारांना १० ते १५ दिवसांचा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये मूर्तिकार महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीचे पथक नोंदणी अर्जांची छाननी करेल व नोंदणीबाबत निर्णय घेईल..