अमरावती : बेलोरा येथील विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा आता तापला असून या विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे, दर्शनी भागात डॉ. पंजाबराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकर, भाऊसाहेब देशमुख फाउंडेशनच्या वतीने माजी कुलगुरू डॉ.गणेश पाटील, फाउंडेशनचे समन्वयक किशोर बोरकर, डॉ .बी.आर.देशमुख, ॲड गजानन पुंडकर, ॲड पी.एस खडसे, डॉ.श्रीकांत देशमुख, भैय्यासाहेब निचळ, प्राचार्य गोपीचंद मेश्राम, रामेश्वर अभ्यंकर,समीर जंवजाळ प्रा.सुजाता झाडे, प्रा.प्रदीप दंदे, यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली आणि मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.

अमरावती विमानतळाला डॉ.पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे, यासाठी विविध सामाजिक संघटना गेल्या चार ते पाच वर्षापासून मागणी करीत आहेत. तसेच अमरावती जिल्हा परिषदेने व महापालिकेने सर्वानुमते ठरावही पारित केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.१३ जुलै २०१९ रोजी बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रसंगी तत्कालीन आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे या मागण्यांचे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे. विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे त्‍यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, बेलोरा विमानतळावरून अमरावती मुंबई, पुणे व दिल्ली प्रवासी वाहतूक सुरू करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

आंदोलनात प्रा. अनिल देशमुख, राजाभाऊ चौधरी, संकेत पाटील, नरेशचंद्र काठोळे, अंजली ठाकरे, अश्विनी चौधरी, समाधान वानखडे, चंद्रकांत मोहिते, रामेश्वर अभ्यंकर, जगदीश गोवर्धन, हेमंत देशमुख, प्रदीप राऊत विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाऊसाहेबांच्या राष्ट्रीय कार्याची दखल घ्यावी – किशोर बोरकर

पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचा विकास व्हावा म्हणून देशांतर्गत कृषक समाजाची स्थापना केली देशभरात भाऊसाहेबांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. भाऊसाहेब देशमुख यांच्या राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन बेलोरा अमरावती विमानतळास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे अशी प्रतिक्रिया शाहू फुले आंबेडकर भाऊसाहेब देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक किशोर बोरकर यांनी दिली.