चंद्रपूर : भद्रावती नगरपालिका निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजकीय खेळी करत भद्रावती भाजप शहर अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष ॲड. सुनील नामोजवार यांना काँग्रेसची नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच रविवारी (१६ नोव्हेंबर) सायंकाळी ॲड. नामोजवार यांनी भाजप शहर अध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत काँगेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांचा गृह मतदारसंघ असलेल्या भद्रावतीत काँग्रेसला शेवटपर्यंत नगराध्यक्षपदासाठी स्वपक्षीय उमेदवार मिळाला नाही. भाजपकडे नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर व ॲड. सुनील नामोजवार अशी दोन चर्चेतील नावे होती. भाजप नेत्यांनी ॲड. नामोजवार यांच्या ऐवजी अनिल धानोरकर यांच्या नावाला पसंती देत त्यांची उमेदवारी निश्चित केली. धानोरकर यांचे नाव निश्चित होताच रविवारी सायंकाळी ॲड. नामोजवार यांनी भाजप शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
ॲड. नामोजवार काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. खासदार धानोरकर व अनिल धानोरकर यांच्यात विधानसभा निवडणुकीपासून वितुष्ट आहे. अनिल धानोरकर यांनी भद्रावती-वरोरा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली होती. मात्र, खासदार धानोरकर यांनी स्वत:चा भाऊ प्रवीण काकडे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली.
या प्रकारामुळे चिडलेल्या अनिल धानोरकर यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेत विधानसभा निवडणूक लढवली. धानोरकर व काकडे या दोघांचाही या निवडणुकीत दारुण पराभव झाला. काकडे यांना अवघी २५ हजार तर धानोरकर यांना १८ हजार मते मिळाली होती. तेव्हापासून येथे धानोरकर विरुद्ध धानोरकर असे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी आता खासदार धानोरकर यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनिल धानोरकर यांचा कुठल्याही स्थितीत पराभव करायचाच असा विडा उचलला आहे. त्यातूनच त्यांनी भाजपचा नगराध्यक्षपदाचा दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार पळवला आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ॲड. नामोजवार यांच्याशी संपर्क साधला असता भाजप शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले.
बंडखोरी उफाळली
राजुरा, गडचांदूर, भद्रावती व ब्रम्हपुरी या चार नगरपालिकेत भाजपात बंडखोरी उफाळून आली आहे. ही बंडाळी भाजप नेते कशा पद्धतीने शांत करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार योग्य दिले नाही म्हणूनच बंड होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
