वर्धा : चांद्रयान अभियान यशस्वी होत असतानाच दुसरीकडे भानामती हा अंधश्रद्धादर्शक प्रकार गावात चर्चेत यावा, याला काय म्हणणार. पण तसे झाले आहे. हिंगणघाट तालुक्यातील इंझळा या गावातील एका कुटुंबाने असा अनुभव घेतला. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यातील तथ्य पुढे आणले.

पती-पत्नी, दोन मुली व एका मुलाचे हे कुटुंब इंझळा गावात राहतात. शुक्रवारी घराच्या शौचालयाच्या खिडकीस कापडाची बाहुली बांधून दिसली. त्याआधी घराबाहेरील विटांवर लिंबूवर मुलीचे नाव लिहलेले दिसून आले होते. त्यावर हळदी कुंकू लावून बांगड्या ठेवल्या होत्या. त्याकडे कुटुंबयांनी दुर्लक्ष केले होते. आज सकाळी घरातील गोठ्यात परत बाहुली दिसली. ती काढून तिला जाळण्याचा प्रयत्न करत असतानाच घराच्या छपरात साडी व पेटीकोट जळत असल्याचे मुलांनी सांगितले. मोठ्यांनी ते तपासले. धूर निघत होता. नंतर कपडे पेटू लागले. आरडाओरड सुरू झाली. गाव जमा झाले. चर्चेत हा प्रकार भानामातीचा असल्याचा सूर उमटू लागला. सर्वच भीतीच्या सावटात होते. काय करावे, कुणालाच सुचत नव्हते.

हेही वाचा >>> खळबळजनक! ‘त्या’ अल्पवयीन मुलीवर दोनदा नव्हे तर तीनवेळा सामूहिक अत्याचार; एकूण ९ जण अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच वेळी अंनिसच्या संपर्कात असलेल्या ऑटोचालक प्रकाश पाणबुडे याने भानामतीची चर्चा ऐकून महाराष्ट्र अंनिसचे गजेंद्र सरकार व भीमसेन गोटे यांना ही बाब कळविली. त्यांनी हिंगणघाट पोलीसांना याची माहिती देत घटनास्थळ गाठले. सूरकार यांनी सदर कुटुंबाशी चर्चा करीत त्यांना धीर दिला. हा निव्वळ खोडसाळपणा आहे. ज्वलनशील असलेला फॉस्फरस किंवा ग्लिसरीन व पोटॅशियम परमग्नेट याचे मिश्रण तयार करून हा प्रकार घडविण्यात आल्याचे समजावून सांगण्यात आले. ही दैवी शक्ती किंवा चमत्कार, भानामती असे काहीच नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. असा प्रकार पुन्हा घडल्यास त्यामागे असणाऱ्या व्यक्तीस पकडून देवू, अशी खात्री देण्यात आली. अंनिसचे अरुण भोसले यांनीही गावकऱ्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी याप्रकरणी पंचनामा केला आहे.