भंडारा : “तलावांचा जिल्हा” अशी भंडारा जिल्ह्याची ओळख. मात्र, तलावांची संख्या कमी झाल्यामुळे ही ओळख आता पुसट होत चालली आहे. दरम्यान, भंडारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच शहरात रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडून त्यांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे, त्यामुळे त्रस्त नागरिकांनी खड्ड्यातील पाण्याचे फोटो टाकून ‘…म्हणून तलावांचा जिल्हा ऐसे नाव’ अशा उपहासात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नगरपरिषदेच्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले असून शहरातील एकही रस्ता खड्डेमुक्त दिसत नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर तर एवढे मोठे खड्डे पडले आहे की, त्याला तलावाचे स्वरुप आले आहे. पावसामुळे या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहनधारकांसोबत नागरिकही चांगलेच मेटाकुटीला आले आहे.
भंडारा शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. एकीकडे शेतकरी आणि नागरिक सुखावले तर दुसरीकडे पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते आता केवळ नावाला उरले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. एक खड्डा चुकवला की दुसऱ्या खड्ड्यात वाहन जात असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांवर एक ते दोन फुटांपर्यंत मोठ-मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचल्याने रात्रीच्या अंधारात वाहनधारकांना हा खड्डा दिसत नाही. त्यामुळे वाहन उसळत आहेत. मार्गावर रस्ता नावालाच उरला आहे. त्रिमूर्ती चौक ते बसस्थानक, शास्त्री चौक ते खांबतलाव चौक, गांधी चौक ते अण्णाभाऊ साठे चौक आणि पुढे मी स्किन टॅंक चौकापर्यंत तसेच मुस्लिम लायब्ररी चौकापासून राजीव गांधी चौक अशा मार्गांसह शहरातील अंतर्गत मार्गांवरही मोठाले खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. नवीन वसाहतीतील रस्त्याबाबत तर विचारायचीही सोय नाही. अनेक वाहनधारक आपली वाहने बाहेर दूर ठेवून चिखल तुडवत घरी जाताना दिसतात. नगरपरिषदेने या रस्त्यांची डागडुजी तात्काळ करावी अशी मागणी आहे.
रस्त्यांची डागडुजी केव्हा?
शहरातील प्रमुख मार्ग खड्ड्यांनी व्यापले आहे. या खड्ड्यांची दुरुस्ती केव्हा केली जाणार असा साधा सरळ प्रश्न नागरिक करीत आहेत. नगरपरिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु अद्याप नगरपरिषदेने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणत्याच उपाययोजना केल्याचे दिसत नाही. सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी खड्ड्यांमध्ये तात्पुरता का होईना मुरुमाचा भराव तरी टाकावा अशी मागणी होत आहे.
गणेश उत्सवातही डागडुजीकडे दुर्लक्ष
शहरात गणेश स्थापनेपासून गणेश विसर्जनापर्यंत दहा दिवस उत्सव आहे. ठिकठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली. मात्र बाप्पांचे आगमन खड्डेमय रस्त्यावरून झाले आणि विसर्जन मिरवणुकही खड्डेयुक्त रस्त्यावरूनच काढावी लागणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात नगरपरिषद या रस्त्यांची डागडुजी करेल अशी अपेक्षा होती, मात्र नगरपरिषदेने उत्सवाच्या काळातही डागडुजीकडे दुर्लक्ष केले.