भंडारा : तालुक्यातील कवडसी जवळील झिरी येथील महादेवाच्या पहाडीवर पावसाळ्यात निर्माण होणारा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते.दरवर्षी पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मात्र सध्या पावसाने या टेकडीचे भूस्खलन होण्याची दाट शक्यता असू. असून हे ठिकाण धोकादायक ठरणार आहे. या ठिकाणी कुणीही जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सह्याद्री टेकडीच्या पर्वत रांगामध्ये हिरव्या शालुने नटलेल्या कुशीत झिरी येथे महादेवाची आहे. महाशिवरात्रीला दरवर्षी विदर्भातील हजारो भाविक दर्शनाकरीता येथे येतात.भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शहापूरपासून दक्षिणेस चार किलोमीटर तर ठाणा पेट्रोलपंपपासून दक्षिणेस सहा किलोमीटर अंतरावर नांदोरा गावाशेजारी सह्याद्री पहाडीच्या हृदयात झिरी हे स्थान आहे. त्या परिसरात टेकड्यांच्या रांगा आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या टेकडीवर झरे वाहू लागतात त्यामुळे पर्यटकांसह नागरिक मोठ्या प्रमाणावर येथे येतात.
दरम्यान या पावसाळ्यात या टेकडीवचा काही भाग खचला असून पावसामुळे कधीही भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत हे ठिकाण पर्यटकांसाठी धोकादायक ठरू शकते. भंडारा पंचायत समितीचे उपसभापती नागेश भगत यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून जनतेला आवाहन केले आहे की, सध्या झिरी कवडशी येथील डोंगरावरील मोठमोठाले दगड कधीही कोसळू शकतात.हे ठिकाण पर्यटकांसाठी सुरक्षित नसल्याने क्षणिक आनंदासाठी कुणीही जीव धोक्यात घालून या ठिकाणी येऊ नये. नागरिकांनी या वर्षी पावसाळ्यात या ठिकाणी धबधबा पाहण्यासाठी येणे टाळावे.याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले की, तहसीलदार आणि ठाणेदार जवाहर नगर यांना या बाबत सुचना केलेल्या आहेत. तातडीने बंदोबस्त लावण्यास कळविले आहे.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन…
सद्यस्थितीला भंडारा जिल्ह्यास भारतीय हवामान खाते मार्फत ऑरेंज अलर्ट असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदी व नाल्यांना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे नदीचे पाणी, धरणातील विसर्ग, कालव्याचे पाणी व तलावाचे पाणी बघायला जाण्याचे टाळावे. सदर ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह करू नये. आपल्या जीवितास त्याच बरोबर सोबतच्या लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असं कोणतंही वर्तन करू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडारा च्या वतीने करण्यात आले आहे.