भंडारा : भंडारा येथील मुकबधिर शाळेतील एक १५ वर्षीय विद्यार्थी मागील आठवडाभरापासून बेपत्ता असून त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या दिवशी तो शिक्षकांना घरी फोन लावून देण्यासाठी सांकेतिक भाषेत विनवणी करत होता, शिक्षकांनी त्याला घरी जाण्यास नकार देत त्याची समजूत घातली मात्र त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक जानकी माधव डुंभारे येथील डेफ अँड डंब स्कूलमध्ये शिकणारा १५ वर्षीय विद्यार्थी १८ ऑगस्ट, सोमवारी दुपारी अचानक बेपत्ता झाला. ही घटना दुपारी ३:३० वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. बेपत्ता विद्यार्थ्याचे नाव खिलेंद्र प्रिन्स थेला आहे. खिलेंद्र हा नाकाडोंगरी येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी शाळेत मध्यानाच्या जेवणाची सुट्टी झाली होती. त्या सुट्टीनंतर खिलेंद्र कोणालाही न सांगता शाळेतून बेपत्ता झाला. शिक्षिका वेणू आत्माराम कामणे यांना हे कळताच त्यांनी व्यवस्थापन आणि सहकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण शहरात शोध घेतला. परंतु जेव्हा खिलेंद्रचा कुठेही थांगपत्ता लागला नाही तेव्हा तुमसर पोलिसांनी मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी शिक्षिकेच्या तक्रारीवरून तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
प्रलोभनाचा संशय
पोलीस उपनिरीक्षक श्रीचंद गंगवानी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असा संशय आहे की, विद्यार्थ्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि शोध सुरू केला आहे. खिलेंद्र देव्हाडी मार्गावरील मोर भवन कॉम्प्लेक्सजवळील एका वसतिगृहात राहत होता. घटनेच्या दिवशी त्याने शिक्षकांच्या हातवारे करून घरी फोन करण्याचा आग्रह धरला. त्याला शांत करून विश्रांतीसाठी वसतिगृहाच्या खोलीत पाठवण्यात आले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दुपारी ३ वाजेपर्यंत खोलीत त्याच्यावर लक्ष ठेवले, परंतु त्यानंतर संधी मिळताच तो अचानक बेपत्ता झाला. अपहरणामागे मानवी तस्करीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मानवी तस्करी ?
शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्याच्या घरी फोन करून त्याच्या हट्टीपणाबद्दल त्याची आई बिंदूला माहिती दिली. परंतु बैल पोळा सण संपल्यानंतरही खिलेंद्र घरी पोहोचला नाही. त्यामुळे पालक, शाळा व्यवस्थापन तसेच पोलिसांची चिंता वाढली आहे. शारीरिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्याच्या अपहरणामागे मानवी तस्करीचा प्रकार तर नाही ना या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहे.
शाळा मुख्य रस्त्यावर असल्याने, विद्यार्थी आतापर्यंत घरी न पोहोचणे आणि शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये अलिकडे वाढ झाल्याने पोलिसांनी दक्षता वाढवली आहे. शहरातून बाहेर पडणाऱ्या सर्व मार्गांवर बसवलेल्या खाजगी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे.