भंडारा : रस्त्यावरील स्पीड ब्रेकर्सची संख्या कमी होती, त्यात भर म्हणून आता मोकट जनावर रस्त्यावर स्पीड ब्रेकरचे आणि दुभाजकांचे काम करीत आहेत. रस्त्याच्या मधोमध चौकात आणि ऐन रहत रहदारीच्या जागी ही मुकट जनावर ठाण मांडून बसलेली असतात. शहरात मोकाट जनावरांच्या त्रासाने नागरिक, व्यावसायिक सारेच प्रचंड वैतागलेले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरांची बसलेल्या झुंडीमुळे वाहतुकीस अडथळा तर होतोच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे आणि गोपालकांच्या बेजबाबदारपणामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न आता जीवघेणा ठरत आहे.
मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे नागरिकांसह येणारे वाहनधारक तसेच व्यावसायिक पुरते हैराण झाले आहेत. आधीच कुत्र्यांचा उपद्रव आहे, त्यात आता मोकाट जनावरांची डोकेदुखी वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे. शहरातील लालबहादूर शास्त्री चौक, गांधी चौक , राजीव गांधी चौक, साई मंदिर मार्ग, मुस्लिम लायब्ररी चौक बस स्टॉप अशा रहदारीच्या ठिकाणी एवढेच काय तर राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा जनावरं सुस्तावलेली असतात त्यामुळे येजा करणाऱ्यांना बसेस आणि चारचाकी वाहनांना मार्ग कसा आणि कुठून काढावा हेच कळत नाही.
नगरपालिकेचे कर्मचारी एक वेळ ‘वेळ’ पाळणार नाही मात्र ही जनावरे सकाळी ८ वाजता पासून रात्री १० वाजता पर्यंत कर्तव्य बजावल्याप्रमाणे नित्यनियमाने रस्त्याच्या मध्यभागी स्वच्छ जागा बघून बसून असतात. बाजाराच्या दिवशी आणि विशेषतः सणासुदींच्या दिवसात या मोकाट जनावरांमुळे अनेकदा ट्रॅफिक जाम होऊन वाहतुकीची कोंडी होते. रस्त्यावरून वाहन चालविणे हे आजच्या घडीला भंडारा वासियांसाठी खरंच मोठे आवाहन ठरत आहे. एकीकडे रस्त्यांवर असलेले मोठमोठे खड्डे, रस्त्यांवरचे अतिक्रमण, पार्किंगची समस्या हे सर्व कमी होते म्हणून आता मोकाट जनावरे यात भर पाडत आहेत.
पावसाळा सुरू होताच मोकाट जनावरे येथील पोलिस ठाण्यासमोर, आठवडे बाजार, बसस्थानक परिसर तसेच ठिकठिकाणी झुंडीने फिरत असतात. रस्त्यातच ठाण मांडून बसलेले असतात. रहदारीस अडथळा होत असून जनावरांमुळे वाहनांना धक्का लागून अपघात होत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. भंडारा ही मुख्य बाजार पेठ असल्याने बहुसंख्य नागरिक हे शहरामध्ये येत असतात. शाळा, विद्यालये, महाविद्यालय असून विदयार्थ्यांची ही मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. रात्रीच्या वेळी वीस ते पंचवीस जनावरांची झुंड रस्त्यावर तसेच दुकानांसमोरील शेडमध्ये आश्रयासाठी येत असल्याने दुकानांसमोरील शेड व पायऱ्यांवर दररोज मलमूत्र पडलेले असते. व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही वर्षांपूर्वी यावर एक उपाय म्हणून नगरपालिकेने या मोकट गुरांच्या शिंगांना रेडियम लावण्याचा उपक्रम केला होता त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना रस्त्याच्या मधोमध बसलेली जनावरे दिसायची आणि अपघाताचा धोका कळत होता मात्र आता याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
पूर्वी बस स्थानकाच्या बाजूला एक, लालबहादूर शास्त्री चौकात एक आणि राजीव गांधी चौकात एक अशी तीन कोणवाडे होती मात्र नगरपरिषद ने ती विकून खाल्ल्याचे बोलले जाते त्या जागांवर आता इतर बांधकाम उभे असल्याचे लक्षात येते मोकट जनावरांमुळे एखादा अपघात घडल्यावरच नगरपरिषद च्या कार्याला गती येईल का असा प्रश्न वाहनधारक आणि नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भातील निविदा मंजूर झाली असून उद्यापासून मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. बस स्थानकाजवळ कांजी हाऊस येथे या जनावरांना ठेवण्यात येणार आहे. – करण कुमार चव्हाण, मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा
गोपालकांवरही कारवाई हवी…
रस्त्यावर मोकाट जनावरे सोडल्यामुळे वाहनधारकांनाच नाही तर जनावरांना सुद्धा दुखापत होऊ शकते ही सामाजिक जबाबदारीची जाणीव गोपालकांनाही असायला हवी. सामाजिक स्वास्थ खराब करणाऱ्या गौपालकांवर देखील कारवाई करण्यात यावी. – राजू सोनवणे, भंडारा