भंडारा : येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या प्रसूती गृहाच्या व्हरांड्याचे बांधकाम करतांनाना कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे काही त्रुटी राहिल्याने जुनी इमारत व नवीन इमारतीला जोडणाऱ्या व्हरांड्यात पावसाळ्यात पाणी गळती होत असल्यामुळे पाणी साचते. याच व्हरांड्यात पार्टेक्स गुळगुळी टाइल्स लावली गेली असल्यामुळे एखाद्या गरोदर महिलेचे पाय स्लिप होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीकडे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

लाखनीला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दर्जोन्नती देऊन ग्रामीण रुग्णालयात रुपांतरीत करण्यात आले. या रुग्णालयाचे कार्यक्षेत्र संपूर्ण तालुका आहे. तसेच उत्तम सेवा देण्यात येत असल्यामुळे प्रसूतीकरिता महिला येत असत. त्या मानाने अद्ययावत प्रसूतीगृह नसल्यामुळे अडचणीचे ठरत असे. वेळ प्रसंगी प्रसूती दरम्यान महिला किंवा नवजात बाळाचा जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे माध्यमातून कोट्यवधी रुपयाचे प्रसूतीगृहाचे बांधकामास आरोग्य विभागाकडून मंजुरी प्रदान करण्यात आली.

मुदतीत प्रसूती गृहाचे बांधकाम पूर्णत्वास आल्याने ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती कक्ष नवीन इमारतीत हलविण्यात आले. पण ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत व नवीन इमारतीस जोडणाऱ्या व्हरांड्याचे बांधकाम सदोष करण्यात आल्याने छतातून पाणी गळती होते. तसेच खाली गुळगुळीत टाइल्स लावल्याने गरोदर महिला किंवा सोबत असणारे नातेवाईक घसरून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवकाळी पावसाने किंवा पावसाळ्यात पाणी गळतीमुळे ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी रुग्णालयाची स्वच्छता सोडून जुन्या व नव्या इमारतीस जोडणाऱ्या व्हरांड्यातील पाणी काढण्यात व्यस्त असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पाणी गळतीमुळे एखादी दुर्घटना झाल्यास त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासन ग्रामीण रुग्णांच्या आरोग्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या करिता प्रयत्नशील असून आवश्यक त्या इमारतीचे बांधकाम करीत असले तरी कंत्राटदाराच्या काही त्रुट्यांमुळे बांधकाम निकृष्ट होतात. त्याचा परिणाम रुग्णांना भोगावा लागतो. असाच प्रकार ग्रामीण रुग्णालय लाखनी येथील जुन्या व नव्या इमारतीस जोडणाऱ्या व्हरांड्यामुळे झाला आहे. याची अनेकदा दुरुस्ती करूनही पाणी गळती सुरूच असल्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने या गंभीर बाबीवर योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.