भंडारा :  एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर दिला जात असताना दुसरीकडे आजही अघोरी विद्या आणि भानामतीसारखे प्रकार सुरूच आहेत. भंडारा तालुक्यात असाच भानामतीचा अघोरी प्रयोग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भर रस्त्यावर भानामती विद्येचे साहित्य आढळून आले असून भानामतीचा प्रयोग करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे  सावट आहे.

भंडारा तालुका अंतर्गत असलेल्या पेट्रोलपंप ठाणा ग्रामपंचायत हद्दीतील विवेकानंद कॉलनी परिसरातील थोटे यांच्या घरापासून ते मेहेर यांच्या घरापर्यंत असलेल्या सिमेंट रस्त्यावर भानामती करणीचा प्रकार रस्त्यावर करण्यात आला.काही अज्ञात व्यक्तींनी किंवा कुटुंबीयाकडून रस्त्यावर तारांगण स्वरूपात रांगोळी काढून त्यावर लाल कुंकू व निंबू ठेवून करणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आज सकाळच्या सुमारास ही बाब एका युवकाच्या लक्षात आल्यावर त्याने याचे फोटो काढून सोशल मीडियावर घातल्याने पेट्रोलपंप ठाणा परिसरात नव्या चर्चांना उधाण आले. कॉलनीतील काही रहिवाशांच्या मनात या सर्व जादूटोण्याच्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आयुध निर्माणी परिसरातील सेवानिवृत्त व अत्यंत सुशिक्षित लोकांचा म्हणून पेट्रोलपंप ठाणा या गावाची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.

या गावातील अनेक युवक देशाच्या रक्षणार्थ मिल्ट्री, पोलीस, जिल्हाधिकारी, वकील, शिक्षक, ते आयुध निर्माणीमध्ये संशोधक पदापर्यंत नोकरीवर कार्यरत आहेत.परंतु गावात घडलेला जादूटोणा, करणी हा प्रकार सर्व स्तरावरून निंदनीय आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्या फोटोमुळे असा अघोरी कृत्य करणाऱ्यांचा शोध व नावाची चर्चा जोरात सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे आणि भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.