भंडारा : गावाबाहेर असलेल्या खातकुड्यावर शेणपुंजन फेकण्यास गेलेल्या तरुणीला गावातीलच एका मद्यपी तरुणाने मारहाण करुन गावातून तिच्या घरापर्यंत मारहाण करुन धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा तालुक्यातील कोथुर्णा गावात घडली. दिनेश शिवशंकर बोंद्रे (३५) रा. कोथुर्णा, असे मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सदर प्रकरणात वरठी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान शेणपुंजन घेऊन तरुणी गावाबाहेर असलेल्या खातकुड्यावर गेली होती.त्यादरम्यान दिनेश बोद्रे या मद्यपीने, ‘येथे कशाला फेकतेस’, असे बोलून क्षुल्लक कारणावरुन तिला शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. दिनेश यावरच थांबला नाही तर काठीने मारहाण करीत खातकुड्यावरुन गावातून तिच्या घरापर्यंत मारहाण करीत एक प्रकारे गावातून धिंड काढली.
मुलगी मारहाणीत,’वाचवा-वाचवा’,अशी ओरडत असतांना घरी असलेली आई व बहिणी वाचविण्यासाठी घरासमोरील रस्त्यावर आल्या. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याने भांडणात आलेल्या आई व बहिणीलाही मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ केली. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांत चीड निर्माण होत आहे.
घडलेल्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पीडित तरुणीने भ्रमणध्वनीवरुन वरठी पोलिसांना संपर्क केला मात्र वरठी पोलिसांनी घडलेल्या प्रकरणाकडे कानाडोळा करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप तरुणीच्या आईने केला आहे. काल पीडितेची आईने जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची भेट घेतली आणि घडलेल्या प्रकरणात न्यायाची मागणी केली. त्या नंतर आरोपी विरोधात गुंज दाखल करण्यात आला. पीडित तरुणीला उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले आहे.