नागपूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लि.तर्फे भारत गौरव पर्यटक ट्रेन नागपूर, सेवाग्राम मार्गे सोडण्यात येणार असून या यात्रेदरम्यान दोन ज्योतिर्लिंग आणि दक्षिण भारताचे दर्शन घडवणार आहे. ही भारत गौरव टूरिस्ट ट्रेन २१ ऑगस्टला मध्य प्रदेशातील रीवा येथून निघणार आहे. ही यात्रा १० दिवस ११ रात्री अशी राहणार आहे. या गाडीला स्लिपर कोच, थर्ड एसी आणि सेकंड एसी अशा वेगवेगळ्या कोचमधून प्रवासी त्यांच्या सोयीनुसार तिकिट काढू शकतात. त्यासाठी अनुक्रमे २० हजार ८०० रुपये, ३५ हजार रुपये आणि ४६ हजार ५०० रुपये प्रति व्यक्ती असा या यात्रेचे भाडे ठरविण्यात आले आहे.
प्रवाशांना सकाळच्या चहा नाश्तापासून तर दुपार आणि रात्रीच्या शुद्ध शाकाहारी जेवणापर्यंतची सुविधा, हॉटेलमधील मुक्काम, दर्शनीय स्थळांवर जाण्यासाठी टूरिस्ट बसगाड्यांची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळे भाडे आकारण्यात येणार नाही. व्यवस्थेची जबाबदारी आयआरसीटीसीकडे राहणार आहे. यात्रेत सहभागी प्रवाशांना विम्याचे कवच रेल्वेकडून दिले जाणार आहे. तिरुपती, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, मल्लिकार्जुन याठिकाणी भेटी देण्यात येतील. रीवा, सतना, कटनी, जबलपूर, नरसिंहपूर, इटारसी, बैतूल, नागपूर आणि सेवाग्राम या स्थानकावरून बोर्डिंगची सुविधा उपलब्ध करून आली आहे. आयआरसीटीसीने पर्यटकांसाठी दोन प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासह दक्षिण भारताची यात्रा आयोजित केल्याची माहिती आयआरसीटीचे कार्यकारी अधिकारी राहूल होळकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
ही गाडी मध्यप्रदेशच्या रीवा, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंहपूर, इटारसी, बैतूल आणि महाराष्ट्रातील नागपूर व सेवाग्राम मार्गे जाणार आहे. या यात्रेसाठी स्लीपर क्लास २० हजार ८०० रुपये, ३५ हजार एसी थ्री टिअर, ४६ हजार ५०० रुपये एसी टू टिअर प्रतिव्यक्ती आकारण्यात येणार आहे.
या गाडीला विशेष एलएचबी डबे लावण्यात येणार आहेत. हे डबे आरामदायक असतील आणि धावत्या गाडीत जेवणाची सुविधा, पर्यटन स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी बसगाड्या, निवासाची व्यवस्था, प्रवासी विमान आणि धावत्या गाडीत सुरक्षा रक्षक उपलब्ध केले जाणार आहेत. या गाडीसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची खास नियुक्ती केली जाणार आहे. आर.सी.टी.सी.च्या भोपाल, जबलपूर व इंदूर रेल्वे स्टेशन कार्यालयावर संपर्क साधून या पर्यटन ट्रेन बद्दल माहिती घेता येणार आहे. या गाडीसाठी ऑनलाईन तसेच तिकीट खिडकीवर तिकीट खरेदी करता येणार आहे.