नागपूर : शिक्षण घेताना झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्री आणि प्रेमात झाले. वर्षभराच्या प्रेमसंबंधानंतर दोघांनीही प्रेमविवाह केला. तरुणीच्या आईला प्रेमविवाह मान्य नसल्यामुळे त्यांच्या संसाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरोसा सेलने पती-पत्नीचे समुपदेशन करून ताटातूट झालेला संसार पुन्हा रुळावर आणला. दोघेही एकाच दुचाकीवरून घराकडे निघाले, तर सासू रिकाम्या हाती पुण्यात परतली.

विनोद आणि रिया (बदललेले नाव) हे दोघेही पदवीच्या शिक्षणाला एकाच महाविद्यालयात शिकत होते. रियाची आई परिचारिका तर वडिल व्यापारी. ती सधन कुटुंबातील असून प्रियकर विनोद हा चिकन विक्रेता आहे. दोघेही अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. तीन वर्षांपूर्वी विनोद आणि रिया यांनी प्रेमविवाह करण्याचे ठरवले. विनोदच्या पालकांनी होकार दिला. मात्र, रियाच्या आईने विरोध केला. विनोदच्या कुटुंबीयांनी रियाच्या कुटुंबीयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण, सर्व काही व्यर्थ होते. दोघांनीही पळून जाऊन लग्न केले. दोघांचाही सुखी संसार सुरू होता. मात्र, रियाची आई वारंवार फोन करून तिला परत बोलावण्याचा प्रयत्न करत होती. वर्षभरानंतर रियाला बाळ झाले. त्यानंतर तिने आईला कार्यक्रमासाठी घरी बोलावले. नातवाचा चेहरा बघून तिचा राग मावळला. काही दिवसांनंतर रिया आणि विनोद यांच्यात खटके उडायला लागले. रिया ही विनोदच्या चारित्र्यावर संशय घेऊन कुण्यातरी युवतीशी अनैतिक संबंध असल्याचा आळ घ्यायला लागली. वाद वाढत गेल्यानंतर विनोदच्या सासूने दोघांच्या संसारात हस्तक्षेप केला. विनोदशी काडीमोड घेऊन सोबत चालण्याबाबत आग्रह केला. यादरम्यान रियाच्या आईची पुण्यात बदली झाली. तिने रिया आणि तिच्या मुलाला घेऊन पुणे गाठले.

हेही वाचा – वर्धा : स्फोटकांच्या आवाजाने शहर हादरले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातून मुलासह गाठले नागपूरला

विनोद पुण्यात रियाच्या आईच्या घरी गेला. मात्र, तिच्या आईने मुलीला पतीसोबत न जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे विनोदने कठोर निर्णय घेत आठ महिन्यांच्या मुलाला घेतले आणि नागपूर गाठले. तीन दिवसांपर्यंत रिया आईच्या दबावापोटी काहीही बोलली नाही. मात्र, मुलाच्या विरहात ती जळत होती. ती वारंवार मुलासाठी हट्ट करीत होती. त्यामुळे नाईलाजास्तव रिया आणि आईने पुण्यातून नागपूर गाठले. पतीने मुलाचे पुण्यातून अपहरण करून आणल्याची तक्रार पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांच्याकडे केली. सुर्वे यांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी लगेच विनोदला बोलावले. तो मुलासह भरोसा सेलमध्ये आला. मुलाला बघताच रियाचे मन विरघळले. सुर्वे यांनी दोघांनाही एकमेकांशी बोलण्याची संधी दिली. रियाची आई बाळाची मागणी करीत होती तर विनोद पुत्रप्रेमासाठी मुलगा द्यायला तयार नव्हता. शेवटी रिया आणि विनोद दोघांचीही सुर्वे यांनी समजूत घातली. सासूमुळे बिघडलेला संसार पुन्हा रुळावर आणला. दोघेही एकमेकांसोबत राहायला तयार झाले.