अमरावती : रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन मी सरन्यायाधीश झाल्यावर आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना व्हावे, ही नियतीची इच्छा असावी, कारण अशाच प्रकारच्या घटना घडत गेल्या. वडिलांच्या स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य फार कमी मुलांना लाभत असेल, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी आज येथे आपल्या भावना व्यक्त केल्या.
दिवंगत माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे लोकार्पण आज पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री आशीष जयस्वाल तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, दादासाहेब गवई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे एक स्मारक अमरावतीत व्हावे, हा विचार समोर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन २५ जुलै २०१८ रोजी होणार होते, पण त्या दिवशी वादळी पावसामुळे त्यांचे विमान उतरू शकले नाही. त्यामुळे हा पायाभरणी सोहळा ३० ऑक्टोबर २०१८ रोजी दादासाहेबांच्या जयंतीदिनी पार पडला.
२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. वेगवेगळ्या कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडत गेले. पण, अलीकडच्या काळात या कामाला गती मिळाली. दादासाहेब यांच्या जयंतीदिनी मी सरन्यायाधीश असताना आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या स्मारकाचे उद्घाटन व्हावे, ही नियतीचीच इच्छा असावी.
सरन्यायाधीश म्हणाले, दादासाहेब गवई हे पहिली निवडणूक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विरोधात लढले. पण, त्यावेळी कडवटपणा नव्हता. दादासाहेब गवई यांनी सर्वच पक्षातील नेत्यांचा सदैव सन्मानच केला. अमरावती शहराला अप्पर वर्धा धरणातून पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जो लढा उभारण्यात आला, त्यात दादासाहेब गवई, दिवंगत डॉ. देविसिंह शेखावत आणि माजी विधान परिषद सदस्य बी.टी. देशमुख यांचे मोठे योगदान होते. या अमरावती विद्यापीठाच्या उभारणीतही या तीन नेत्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
सरन्यायाधीश म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सहकार्याशिवाय दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता. स्मारकाची अत्यंत सुंदर अशी वास्तू उभारण्यात आली आहे. या वास्तूचा उपयोग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला होणार आहे.
