नागपूर : गटातटात विभागलेली शहरातील शिवसेना पक्षावर संकट आले तरी एकत्र आली नाही. मंगळवारी जिल्हा शिवसेनेतर्फे आयोजित मेळाव्यात हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा व्यक्त केली. दरम्यान, शहरात मेळावा होऊनही एका गटाचे नेते यात सहभागी झाले नाहीत, याबाबत शिवसैनिकांमध्ये चर्चा होती.

शिवसेनेतील बंडानंतर मंगळवारी जिल्हा शिवसेनेतर्फे येथील जैन कलार सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा झाला. मेळाव्याला जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे, संदीप इटकेलवार, महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, ग्रामीणचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे व जिल्हा व शहरातील सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हरणे म्हणाले, शिवसेनेत याआधी झालेल्या सेनेच्या बंडाशी नागपूरचा संबध होता, मात्र शिवसैनिक पक्षासोबतच कायम राहिला. आताच्या बंडाशीही नागपूर जिल्ह्याचाच संबंध असून आम्ही बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ.

हरडे म्हणाले, बंडखोरी सेनेला नवीन नाही. प्रत्येक वेळी शिवसैनिकांनी नव्याने उभारी घेत संघटना वाढवली आहे. आताही पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ. जिल्हा संघटिका रचना कन्हेरे म्हणाल्या, शरीराचा एखादा अवयव निकामी झाला तर तो कापून फेकला जातो. बंडखोरांची स्थिती यापेक्षा वेगळी होणार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी नव्या जोमाने पुढे जाणे आवश्यक आहे. मेळाव्याला महानगर संपर्क प्रमुखांसह इतर शहरातील प्रमुख पदाधिकारी गैरहजर होते. या मेळाव्याला दिवाकर पाटणे, युवासेनेचे हर्षल काकडे, करुणा आष्टनकर, देवेंद्र गोडबोले, अंजुशा बोधनकर, सुरेखा खोब्रागडे, सुशीला नायक, अश्विनी पिंपळकर, किशोर ठाकरे आणि तृप्ती पशिने उपस्थित होते.