नागपूर : राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे. यात आतापर्यंत काही अधिकारी आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली असून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ तयार करणाऱ्या शेकडो शिक्षकांवर कारवाई होणार असल्याची माहिती आहे. २०१४च्या शिक्षक भरतीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयाच्या शिक्षकांची गैरमार्गाने भरती करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्व संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत हे उल्लेखनिय. ज्या शिक्षकांचे गैरमार्गाने शालार्थ आयडी तयार करण्यात आले त्यांच्या बँक खात्यात दहा वर्षांची लाखो रुपयांची थकबाकी जमा झाल्याची माहिती आहे.

राज्यात २०११ मध्ये अनुदानित शाळांची पडताळणी करण्यात आली होती. यावेळी नोंदी असलेले विद्यार्थी आणि प्रत्यक्ष हजर विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी तफावत आढळून आली. खोटी विद्यार्थी संख्या दाखवून शिक्षकांची पदे भरली जात असल्याचा निष्कर्ष पडताळणी समितीने दिला. त्यामुळे राज्य शासनाने २ मे २०१२च्या शासन निर्णयानुसार, राज्यात शिक्षक भरतीवर बंदी घालत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय नवीन भरती होणार नाही असे सक्त आदेश दिले. शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांनी यासाठी मान्यता दिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल असे आदेश देण्यात आले होते. असे असताना २०१४ मध्ये नवीन शासन आदेश काढण्यात आला. यानुसार ज्या शाळांमध्ये इंग्रजी, विज्ञान आणि गणित विषयासाठी शिक्षकांची आवश्यकता असेल त्यांनी मंत्रालयातून मान्यता घेऊन भरती करावी, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी काही शाळांमध्ये नियमानुसार शिक्षक भरती घेण्यात आली. राज्यात २०१९ पासून अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये रूजू होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याला ‘शालार्थ आयडी’ देण्याचा अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात आला.

याचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रे, शिक्षण संस्थांचा बनावट शिक्षक मान्यतेचा प्रस्ताव आणि शिक्षणाधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करून २०१९ पासून शेकडो शिक्षकांच्या पदांची भरती करण्यात आली. परंतु, २०१४ पासून गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयाच्या शिक्षक भरतीला मान्यता मिळाल्याने तेव्हापासून शिक्षक रूजू दाखवण्यात आले. त्यांचे ‘शालार्थ आयडी’ २०१९ पासून २०२५ पर्यंत गैरमार्गाने तयार करून आठ ते दहा वर्षांच्या थकबाकीची उचलही करण्यात आली. शिक्षण संस्था चालक, शिक्षण उपसंचालक आणि वेतन अधिक्षकांच्या संगनमताने लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करून गैरमार्गाने हा सर्व घोटाळा झाला. अशाप्रकारे बनावट कागदपत्रे आणि गैरमार्गाने शालार्थ आयडी तयार करण्यात आलेल्या शिक्षकांवरही कारवाई होणार आहे.गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ तयार करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे. यात दोषी आढणाऱ्यांवर निश्चित कारवाई होणार आहे.बळीराम सुतार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर.