अमरावती : महात्मा फुले यांच्या सत्यशोधक तत्त्वांचे आचरण करून गौरव आणि प्रगती यांनी सप्तपदीऐवजी सत्य, प्रेम, विवेक, अहिंसा, श्रम, सदाचार आणि परिवर्तन या सात तत्त्वांना समोर ठेवले व सत्यशोधक विवाह केला. परतवाडा येथे हा आदर्शवत विवाह सोहळा पार पडला.अचलपूर येथील प्रगती गावंडे व अंजनगाव तालुक्यातील चौसाळा येथील गौरव भराटे या उच्चशिक्षित वरवधूंनी आपला विवाह पारंपारिक व खर्चिक न करता सत्यशोधक पध्दतीने करावा हा विचार आपापल्या कुटुंबाकडे मांडल्याने हा सोहळा घडून आल्याचे सिद्धकुमार दाळू यांनी सांगताच फटाक्यांऐवजी टाळ्यांच्या कडकडाटात वधुवरांचे उपस्थितांनी स्वागत केले.
विशेष म्हणजे लग्नात आहेर म्हणून महापुरूषांची चरित्रात्मक आणि उपयोगी पुस्तके स्वीकारली.निमंत्रण पत्रिकेमध्ये विविध महापुरुषांची छायाचित्रे, ग्रामगीतेतील अध्यायाचा उल्लेख होता. ‘वराकडील बँड, घोड्यावरील मिरवणूक, कर्मकांडे इत्यादी निरर्थक बाबींवर खर्च न करता त्यातून वाचलेले पैसे सत्कारणी लागावे म्हणून संत-महापुरूषांच्या जयंती पुण्यतीथी मधून त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याकरीता काही रक्कम दरवर्षी देण्याचा संकल्प करत आहोत. तसेच काही पैसे दान म्हणून अनाथलयाला देत आहोत. यातून समाजकार्याची जाहिरात वगैरे करण्याचा कोणताही उद्देश नसून, समाजातील लोकांनी आदर्श घेवून काही गोष्टी स्वीकाराव्यात’ हा सामाजिक संदेश छापून होता.
हेही वाचा >>>नागपूर: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज नागपुरात मुक्काम, कुठे- कुठे जाणार ?
या विवाह सोहळ्याला ज्येष्ठ कीर्तनकार सत्यपाल महाराज, संदीपपाल व रामपाल महाराज, प्रेमकुमार बोके, पंकज आवारे, जयकुमार चर्जन, सिद्धकुमार दाळू, विजय बेदरकर, प्रा .वाल्मीक भगत, आदी परिवर्तनवादी चळवळीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.अमरावती जिल्हयातील करजगाव, बेलोरा, शिरजगाव बंड यासारखी अनेक गावे ही सत्यशोधक चळवळीचे प्रमुख केंद्र होती. येथूनच पश्चिम विदर्भात सत्यशोधक चळवळीचे कार्य चालत असे. कालपरत्वे हे कार्य मागे पडले असल्याने हा विवाह सामाजिक बदलाचा नवीन संदेश देणारा आहे. समाजाने याच पद्धतीचे लग्न समारंभ साजरे करावे, असे आवाहन सत्यपाल महाराज यांनी केले.