नागपूर: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी भाजपने वरिष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उच्चस्तरीय रणनीती बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बावनकुळे यांनी महायुती आघाडीवर पूर्ण विश्वास व्यक्त करत ५१ टक्के मत मिळवून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रत्येक जिल्ह्यात प्रचार व समन्वय समित्या नेमून महायुती आघाडीची तयारी मजबूत केली जात आहे.
कामठी नगरपरिषदेसह राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये महायुती एकसंधपणे आणि ताकदीने मैदानात उतरली असून, “जनता विकासाला मत देणार आहे, धर्मपंथापलीकडे जाऊन मतदान होईल, असा ठाम विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला असला तरी त्यांच्यासमोर बंडखोरांचे मोठे आवाहन आहे.
कामठी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, कामठीमध्ये नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्यासह सर्व नगरसेवकांनी महायुतीतर्फे अर्ज भरले असून, महायुतीला किमान ५१ टक्के मते मिळणार असल्याने आमचा विजय निश्चित आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी महायुतीची युती झाली आहे. काही ठिकाणी महायुती म्हणून तर काही ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही लढत आहोत. ज्या ठिकाणी मित्रपक्षाविरुद्ध लढत आहोत, तिथेही मनभेद निर्माण होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार सर्वसमावेशक विकास करत आहे. योजनांचा लाभ सर्व समाजापर्यंत पोहोचवायचा असेल, तर महायुतीचा नगराध्यक्ष निवडून येणे गरजेचे आहे. नगरपालिकांचा विकास करण्याची क्षमता भाजप आणि महायुतीकडेच आहे, असे त्यांनी सांगितले.
बिहार निवडणुकीचा प्रभाव दिसेल
काही ठिकाणी झालेल्या बंडखोरीवर बोलताना ते म्हणाले, “अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सर्व बंडखोर आपले अर्ज मागे घेतील.” गोंदिया–भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत असल्याचेही त्यांनी सांगितले. बिहारचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसेल. राज्यातील निर्णयप्रक्रियेवर बोलताना बावनकुळे म्हणाले, “ज्या पदाला ज्या व्यक्तीची गरज असते, त्या वेळेस महाराष्ट्र निर्णय घेतो. सरकार कोणतेही असो. काही विषय भावनिक असतात, त्यावरच निर्णय घेतले जातात. बिहारचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसेल,” असेही त्यांनी सांगितले.
