नागपूर: मराठा आरक्षणाची जुनी मागणी पुन्हा चर्चेत आणत आंदोलनकर्ते मनोज जरांगे व समर्थक मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईत आंदोलनास कुठे परवानगी, किती वेळ परवानगी याचा तपशील जाहीर झाल्यानंतर प्रत्येक गावी आंदोलकांच्या संख्येत भर पडत असल्याचे दिसून आले. जरांगे आंदोलनावर विविध राजकीय पक्षामधून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून प्रश्नही केला आहे.
बावनकुळे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रामध्ये गणपतीसारखा मोठा उत्सव सुरू आहे. प्रत्येकाच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. असे असताना या काळात जरांगेंनी मोर्चा काढणे हे बरोबर नाही. सरकारकडे विविध मागण्या करणे, त्यासाठी मोर्चा काढण्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र मोर्च्याची वेळ बदलता आली असती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप सरकारने अनेकदा प्रयत्न केले आहेत. त्यांच्या आरक्षणासाठी आमचे पूर्ण समर्थन आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर समाजाचे आरक्षणाला कुठेही धक्का लागायला नको ही भाजपची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना २०१४ ते २०१९ या काळातही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले. आजही सरकारची भूमिका मराठा समाजाचे आरक्षण देण्याच्या बाजूनेच आहे. मात्र हे आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाचे आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे बावनकुळे म्हणाले.
राहुल गांधी बद्दल नेमके काय म्हणाले बावनकुळे?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभर यात्रा केली. त्यांनी अनेकदा ओबीसी समाजाच्या आणि इतर मागास समाजाच्या पाठीमागे उभा असल्याचे सांगितले. जातीनिहाय जनगणनेसाठी ही त्यांनी मागणी केली होती. आज पंतप्रधान मोदींनी जनगणना करण्याचे मान्य केलेल आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी ओबीसी समाजाच्या मागे असल्याचे सांगत असताना महाराष्ट्रातील नेते मात्र ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असतील तर हे दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनी जरांगेच्या आंदोलनाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांची मंजुरी आहे का हे त्यांनी स्पष्ट करावे, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही
मराठा समाजाला आरक्षण देणे ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पूर्णपणे स्वीकारली आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊनच आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करू. मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना एससी, एसटी आणि ओबीसी या कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करता कामा नये, ही आमची ठाम भूमिका आहे. ओबीसीतून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणे ही आमची भूमिका नाही. एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला दिल्यास संविधानाच्या चौकटीला धक्का लागू शकतो. काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे यांनी आव्हान दिले, मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यायचे की स्वतंत्र आरक्षण द्यायचे, याबाबत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तसेच ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या आंदोलनाला काँग्रेसच्या काही नेत्यांनी समर्थन दिले आहे. या समर्थनामागे राहुल गांधी यांचीही भूमिका आहे का, हे काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे.