नागपूर: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अचानक भाकरी फिरवली आहे. शहर आणि जिल्ह्याच्या अध्यक्ष बदलण्यात आले आहेत. तर जिल्ह्यासाठी दोन अध्यक्ष नेमले आहेत. नागपूर जिल्ह्याचा ग्रामीण भागातील व्याप आता इतका मोठा झाला आहे की, भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक दृष्टिकोनातून ग्रामीण परिसराचे दोन भाग करून दोन जिल्हाध्यक्ष द्यावेत, अशी वेळ आली आहे, असा प्रस्ताव खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दिला होता.
त्यानंतर आता भाजपच्या जिल्हाअध्यक्षांची यादी जाहीर झाली असून शहराचे नवे अध्यक्ष म्हणून माजी महापौर दयाशंकर तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. तर भाजने नागपूर ग्रामीणचे दोन भाग केले असून मनोहर कुंभारे नागपूर ग्रामीण काटोल तर अनंतराव राऊत नागपूर ग्रामीण रामटेकचे नवे अध्यक्ष राहणार आहेत. शहर अध्यक्षपद आपल्या गटाकडे असावे यासाठी नागपूर भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच आहे. विद्यमान शहर अध्यक्ष बंटी कुकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक मानले जातात. आमदार प्रवीण दटके यांचे नाव अचानक या पदासाठी पुढे आले होते. दटके माजी महापौर आहेत. त्याही पेक्षा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, भाजपने सर्वांनाच धक्का देत नवीन अध्यक्ष दिले आहेत.
भाजपमध्ये नागपूर शहराप्रमाणेच आता ग्रामीणसाठीसुद्धा नव्याने अध्यक्ष शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. यात जुन्यांनाच परत एकदा संधी दिली जाणार की नवे येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागूनच होते. मात्र, भाजप आता संघटनात्मक स्तरावर बरेच बदल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्ष देण्याचा मानस बावनकुळेंनी नड्डांकडे व्यक्त केला होता.
भविष्यात अर्थात २०२९ मध्ये शहरातील मतदारसंघामध्ये बरेच बदल झालेले असतील. वाढलेल्या लोकसंख्या व मतदारसंख्येनुसार जिल्ह्यात दोन पेक्षामिळण्याची शक्यता आहे. भविष्यात अर्थात २०२९ मध्ये शहरातील मतदारसंघामध्ये बरेच बदल झालेले असतील. वाढलेल्या लोकसंख्या व मतदारसंख्येनुसार जिल्ह्यात दोन पेक्षा अधिक मतदारसंघ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने यावेळी जिल्ह्यामध्ये दोन अध्यक्ष दिले आहेत. ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्ष मिळाल्याने भाजपचा जातीचे समीकरण बसवणे अधिक सोपे होणार आहे.
रामटेक, काटोल मुख्यालये सध्याचा रामटेक लोकसभा मतदारसंघ हा भौगोलिक दृष्टिकोनातून फारच मोठा असून त्यात २,४५३ मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे रामटेक व काटोल असे दोन भाग करावेत. रामटेक, उमरेड व कामठीचे मुख्यालय रामटेक असेल तसेच काटोल, हिंगणा व सावनेरचे मुख्यालय काटोल असावे. संघटनात्मक कामकाजाच्या दृष्टिकोनातून दोन जिल्हाध्यक्ष नेमणे सोयीस्कर व फायद्याचे ठरेल, असा प्रस्ताव चंद्रशेखर बावनकुळेंनी पक्षश्रेष्ठींकडे पाठविला होता.