चंद्रपूर : जिल्ह्यातील दहा नगरपालिका व एक नगर पंचायत निवडणुकीत भाजप व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षातच खरीत लढत होणार आहे. दोन्ही पक्षांनी युती व आघाडीत नगराध्यक्षपद सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने मित्रपक्षांमध्ये नाराजीची भावना आहे.

जिल्ह्यात भाजप सर्वाधिक प्रबळ पक्ष आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे व करण देवतळे, असे पाच आमदार आहेत. काँग्रेसकडे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर आहेत. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदांवर लक्ष केंद्रित केले आहे. दोन्ही पक्ष नगराध्यक्षपद सोडायला तयार नाहीत. भाजपने, नगरसेवकपदांसाठी आम्ही म्हणू तेवढ्याच जागा मिळतील, अशी भूमिका घेतल्याने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी आहे.

काँग्रेसनेही भाजपसारखीच भूमिका घेतली आहे. भद्रावती पालिकेत शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे नगराध्यक्षपद आम्हाला सोडावे, अशी विनंती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी खासदार धानोरकर यांना केली आहे. मात्र, भद्रावती पालिकेत बाळू धानोरकर यांच्याच बळावर शिवसेनेची सत्ता येत होती, असे सांगत खसदार धानोरकर नगराध्यक्षपद सोडण्यास तयार नाहीत.

राजुरा येथे काँग्रेस-शेतकरी संघटनेत युती झाली असली तरी नगराध्यक्षपद काँग्रेसने स्वत:कडे ठेवले आहे. वरोरा, बल्लारपूर, गडचांदूर, ब्रह्मपुरी, नागभीड, मूल, घुग्घुस येथेही भाजप आणि काँग्रेस मित्रपक्षांना नगराध्यक्ष पद सोडायला तयार नाहीत. त्यांची उपाध्यक्षपदावर बोळवण करण्यात येत आहे.

‘काँग्रेस विश्वासात घेत नाही’

काँग्रेस आघाडीबाबत विश्वासात घेत नसल्याचा आरोप शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केला आहे. आघाडीसंदर्भातील निर्णयासाठी बैठका होणे गरजेचे आहे. मात्र, काँग्रेस नेते स्वत:च बैठका घेवून आघाडी घाेषित करीत आहेत, असे वैद्य यांचे म्हणणे आहे. शरद पवार गटाने गडचांदूर नगराध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र, काँग्रेसने हा प्रस्ताव धुडकावून लावला.