चंद्रपूर: नगरोत्थान निधी वाटपावरून भाजपात घमासान, नगरसेवक नाराज

नगरोत्थान महाअभियान निधीच्या वाटपावरून भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये घमासान सुरू झाले आहे.

bjp
(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता)

नगरोत्थान महाअभियान निधीच्या वाटपावरून भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये घमासान सुरू झाले आहे. एकूण १२ कोटी ९९ लाखांच्या निधीपैकी माजी महापौर राखी कंचर्लावार व माजी उपमहापौर राहुल पावडे या दोघांच्या प्रभागात ९ कोटी २२ लाखाच्या निधीची कामे मंजूर केल्याने भाजपच्या ११ महिला नगरसेविकांनी आयुक्त विपीन पालिवाल यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निधी वाटपातील या दुजाभावामुळे पुन्हा एकदा भाजपातील दुफळी समोर आली आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर: ‘वाचाल तर वाचाल’, नवरगाव येथे विदर्भातील पहिली वाचन संस्कृती कार्यशाळा

महापालिकेत मागील अकरा महिन्यांपासून प्रशासक अर्थात आयुक्त विपीन पालिवाल यांची एकहाती सत्ता आहे. आयुक्त सर्वेसर्वा असले तरी राज्याचे वन, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशाशिवाय पालिकेतील सूत्र हलत नाही ही वस्तुस्थिती आहे. नुकताच महापालिकेला नगरोत्थान महाअभियान योजनेचा १२ कोटी ९९ लाखांचा निधी मिळाला आहे. हा निधी महापालिका क्षेत्रातील सर्वच प्रभागात समसमान वितरित होणे ही माजी नगरसेवकांची किमान अपेक्षा होती. मात्र माजी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे या दोघांच्याच प्रभागात ९ कोटी २२ लाखांची विविध कामे या निधीतून प्रस्तावित आहेत. तसेच संजय कंचर्लावार व अन्य काही नगरसेवकांच्या प्रभागातही या निधीतून कामे घेण्यात आली आहे. दोन माजी पदाधिकाऱ्यांच्याच प्रभागात ९० टक्क्यांपेक्षा अधिकचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती भाजपच्या काही माजी नगरसेवकांना मिळताच असंतोषाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. मंगळवारी भाजप पदाधिकारी व माजी नगरसेवकांची राम जन्मोत्सवानिमित्त बैठक बोलावण्यात आली होती. त्याच बैठकीत काही महिला नगरसेवकांची या निधी वाटपावर चर्चा झाली. या चर्चेनंतर माजी महापौर अंजली घोटेकर, माजी नगरसेविका सविता कांबळे, पुष्पा उराडे, वंदना जांभुळकर, माया उईके, शीतल आत्राम, छबू वैरागडे, शीला चव्हाण, शीतल गुरनुले, वंदना तिखे अशा ११ नगरसेविकांनी थेट महापालिका गाठून आयुक्त विपीन पालिवाल यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त पालिवाल यांना संतप्त नगरसेविकांनी नगरोत्थान निधी वाटपात दुजाभाव केला आहे. चेहरे बघून निधी वाटप करता काय असा आरोप केला. दरम्यान, या निधी वाटपावरून भाजपात चांगलेच घमासान सुरू झाले आहे. पक्षात वारंवार काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनाच निधीची खैरात वाटप केल्या जाते असाही आरोप होत आहे. निधी वाटप समसमान करायला हवा अशीही मागणी या माजी नगरसेविकांनी आयुक्तांकडे केली आहे.

हेही वाचा >>>बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी, चंद्रपूर जिल्ह्यात २८ एप्रिलला निवडणूक

निधी वाटपावरून नाराज असलेल्या माजी नगरसेविका पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. रामनाम जाप पुस्तिकेचे वितरण कार्यक्रमाला पालकमंत्री येणार असल्याची माहिती नगरसेविकांना मिळाली होती. त्यामुळे मंगळवारी रात्री बारा वाजताचा टाईम या सर्व नाराज नगरसेविकांनी घेतला होता. मात्र पालकमंत्री मध्यरात्री दोन वाजता चंद्रपुरात आले. त्यामुळे या नगरसेविकांची भेट होऊ शकली नाही. आज गांधी चौकात देखील या नगरसेविका पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. तिथेही कार्यक्रमातील व्यस्ततेमुळे भेट झाली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर या सर्व माजी नगरसेविका पालकमंत्र्यांची भेट घेऊन आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता किमान प्रत्येकाला ५० लाखाचा निधी द्यावा अशी मागणी करणार आहेत.

पावडे यांची कानउघाडणी

मागील आठवड्यात भाजपने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश कार्यक्रम राबवला होता. कोणालाही विश्वासात न घेता माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी हा पक्षप्रवेश कार्यक्रम राबवला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी पावडे यांची विश्रामगृहावरील बैठकीत चांगलीच कानउघाडणी केली. आता कार्यक्रमांसाठी स्थानिक पातळीवर कोअर कमेटी गठित करण्यात आली आहे. या कोअर कमेटीत चार महामंडी, शहर अध्यक्ष तथा अन्य एका पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 18:55 IST
Next Story
बुलढाणा: वासनांध पित्याचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता चार महिन्यांची गरोदर
Exit mobile version