नागपूर : विधानसभेमध्ये भाजपने प्रचंड मोठे यश मिळवले. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठीही भाजपने सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. मात्र, अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही.यामुळे ५१ टक्के मतदान घेऊन निवडणुका जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. तसेच उमदेवारांना फोन करून अर्ज करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. यामुळे भाजप आणि मित्रपक्षांमध्ये काहीही आलबेल नसल्याचे बोलले जाते. विदर्भामध्ये ४५ नगरपालिका आणि ५५ नगरपंचायतींसाठी निवडूका होत आहेत.

तर जिल्ह्यातील १५ नगरपालिका आणि १२ नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज १७ नोव्हेंबर अखेरचा दिवस असून अजूनही महायुती किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्षात जागा वाटपाबाबत समन्वय होत नसल्याने सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावरच जोर दिला आहे. सोमवारी दुपारपर्यंत भाजपकडून यादी जाहीर झालेली नाही. नागपूर जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष असून त्यांचे मित्रपक्षासोबतचे धोरण ताठर स्वरूपाचे आहे.

त्यामुळे त्यांच्यात नाराजी असून सर्वांनी युती न झाल्यास स्वबळार लढू अशीच भूमिका घेतली आहे. महायुतीतील भाजपचा सूर प्रथमपासूनच स्वबाळकडे आहे, त्यामुळे त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शक्य होईल तेथे युती करून इतरत्र स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्येही हीच स्थिती आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गटासोबत काँग्रेसने आघाडीबाबत बोलणीच सुरू केली नाही. काँग्रेसने तर मुलाखतीही आटोपल्या. त्यामुळे मित्र पक्षांनी काही ठिकाणी स्बबळावर तर काही ठिकाणी इतर पक्षाशी आघाडीसाठी पावले उचलली आहेत.

मंत्री इच्छुक मात्र…

रामटेक तालुक्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार व राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी काही ठिकाणी भाजपसोबत युती करण्याची भूमिका घेतली आहे. पारशिवनी व कांद्री नगर पंचायतीत हे दोन्ही पक्ष एकत्रित लढण्याची शक्यता आहे, मात्र रामटेक पालिकेबाबत अद्याप सेनेसोबत भाजपची युती होईल किंवा नाही हे स्पष्ट नाही. कन्हान नगरपालिकेतही सेना स्वबळावर लढणार की भाजप त्यांना साथ देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उमरेड पालिकेत शिंदे सेना व अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता आहे. भाजपची वाटचाल स्बबळाकडेच आहे. भिवापूरमध्येही मैत्रीपूर्ण लढतच होईल हे सध्याचे चित्र आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचासोबत युती होणार किंवा नाही हे स्पष्ट नाही. हिंगणा तालुक्यातही भाजप स्वबळावरच लढण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे एकला चलोरे

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या एकला चलोरेच्या भूमिकेमुळे मित्रपक्ष राष्ट्रवादी शरद पवार व शिवसेना ठाकरे गटात अस्वस्थता आहे, ठाकरे गटाने तर मोहपा पालिकेची निवडणूक स्वबळावरच लढण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात अद्याप आघाडीची बोलणीच पूर्ण झाली नाही, देशमुखांनी शेतकरी कामगार पक्षासोबत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत, याबाबतचे चित्रही सोमवारीच स्पष्ट होणार आहे. ग्रामीणमध्ये सावनेर, उमरेड मतदारसंघात काँग्रेसची वाटचाल स्वबळाच्याच दिशेने आहे.