वर्धा : भाजप जिल्हाध्यक्षपद आगामी काळात महत्वाचे ठरणार. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. त्या झेपेल असा व कोणाचाच विरोध नाही असा, हे सूत्र पुढे आले आणि भाकरी फिरली. तोच ठेवला तर भाकरी करपणार, हे वरिष्ठ नेत्यांना प्राप्त तक्रारी पाहून उमगले होते. मावळते जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हे बहुतांश नेत्यांच्या प्रथम पसंतीचे होते. पण आमदार दादाराव केचे यांचा उघड तर माजी खासदार रामदास तडस यांचा छुपा विरोध या घडामोडीत दिसून आला होता.
गफाट द्या, पण बदल करायचा असेल तर आमच्या मनाने करा, हे पण झाले. तडस व केचे हे दोन नेते गफाट नाही म्हणतात तेव्हाच स्पष्ट झाले की गफाट जाणार. मग तेली व कुणबी म्हणजे कुते नको, असा सूर आळविण्यात आला. तेव्हा पुलगाव येथील सुनील गाते हे नाव पुढे आले. दरम्यान तडस यांचे शिष्य मिलिंद भेंडे हे नाव आमदार केचे मार्फत पुढे करण्यात आले. पण ते तर होणार नाहीच, असा छातीठोक दावा सर्व करत होते. माजी नगराध्यक्ष अतुल तराळे यांचे नाव एका विदर्भस्तरीय संघटना नेत्याने रेटले. पण पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांचा त्यास कडाडून विरोध झाला. ते साहजिक. कारण भोयर यांची विधानसभा उमेदवारी नको, असा थेट पवित्रा घेण्यात तराळे आघाडीवर होते.
तेली समाज नेता पाहिजे असेल तर मग प्रशांत बुरले यांना अध्यक्ष करा नं, असा पवित्रा पालकमंत्री गटाने घेतला. तर जिल्ह्यात तेली समाज नेता अध्यक्ष होण्याची बाब काहींना अडचणीची ठरत होती. शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्मास यावा, ही नीती. मग परत विचारविनिमय झाला. आमदार सुमित वानखेडे हे गटबाजीच्या राजकारणात नं पडणारे व तशी गरज नसलेले. आमदार समीर कुणावार यांचे मत पक्षात गांभीर्याने कोणीच घेत नाही व आमदार राजेश बकाने तटस्थ, असे स्पष्ट करीत एका नेत्याने नमूद केले की पालकमंत्री प्रभावी भूमिका पार पाडणार, हे स्पष्ट झाले होते. एक नवाच मुद्दा पुढे आला. असे गटीय राजकारण कशाला, असे संघ वर्तुळ बोलू लागले. विशिष्ट समाजाचा नकोच, जो सगळ्यांना चालेल, असा अध्यक्ष करा, शिक्का नसेल आणि कार्यकर्त्यास आपला वाटेल असा अध्यक्ष करा, हे सूत्र फिरविण्यात आले. हा जिल्हा राजकारणाच्या नवा पैलू ठरला. गाते यांना भेटून दोन नेत्यांनी तयार रहा, असा संदेश दिला. अखेर ते अध्यक्ष झाले. चला कोणाचाच नाही, हा सगळ्यांचा, हा निश्वास उमटला. पण ते कोणाचे हे त्यांचे नाव जाहीर होताच सर्वाधिक आनंद व्यक्त करणाऱ्या नेत्यांचे चेहरे पाहून स्पष्ट झाले.