नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण -पश्चिम विधानसभा मतदारसंघात महापालिकेच्या नऊ प्रभागांचा समावेश असून येथे २०१७ च्या निवडणुकीत भाजपने २५ जागापैकी २१ जागा जिंकल्या होत्या. परंतु, नंतर विधानसभा निवडणुकीत फडणवीसांचे मताधिक्य कमी झाले. ही संधी साधून काँग्रेस येथे नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी काय करणार, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या मतदारसंघात १६, ३५, ३६, ३७ आणि ३८ हे पाच प्रभाग पूर्णपणे समाविष्ट आहेत. प्रभाग क्रमांक १३, ३३ आणि ३४ चा केवळ एक चतुर्थांश भाग या विधानसभेत मोडतो. प्रभाग क्रमांक १७ मधील एक नगरसेवक सोडल्यास संपूर्ण भाग या विधानसभेत आहे. येथील एकूण २५ जागांपैकी २१ नगरसेवक भाजपचे तर चार नगरसेवक काँग्रेसचे होते. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी प्रभाग क्रमांक ३८ वरील वर्चस्व टिकून ठेवले व या प्रभागातील सर्व तीनही जागा काँग्रेसकडे कायम ठेवल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिममधून ‘हॅटट्रिक’ केली. त्यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत १ लाख २९ हजार ४०१ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी गुडधे यांनी ८९ हजार ६९१ मते घेतली. फडणवीस यांचे मताधिक्य ९ हजार ६४३ मतांनी कमी झाले.

या मतदारसंघातील नऊ प्रभागातील काही भाग दक्षिण, मध्य आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील आहे. प्रभाग क्रमांक १३ चा एक भाग दक्षिण पश्चिम आणि उर्वरित परिसर पश्चिम नागपूरमध्ये आहे. प्रभाग क्रमांक १६ चा संपूर्ण परिसर दक्षिण-पश्चिममध्ये आहे. येथे सर्व चारही नगरसेवक भाजपचे आहेत. प्रभाग क्रमांक १७ मध्ये काही भाग मध्य नागपूरचा आहे. यातील तीन पैकी दोन भाजपचे आणि एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. प्रभाग क्रमांक ३३, ३४ चा ७५ टक्के परिसर दक्षिण नागपूरमध्ये आहे. २५ टक्के परिसर दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये आहे. या दोन्ही प्रभागात भाजपचे नगरसेवक आहेत. प्रभाग क्रमांक ३५, ३६ आणि ३७ मध्ये सर्व चारही नगरसेवक भाजपचे आहेत. प्रभाग क्रमांक ३८ मध्ये काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांचा वरचष्मा दिसून येतो. या प्रभागात जयताळा आणि आजूबाजूचा परिसर आहे. या प्रभागात केवळ तीन जागा आहेत. त्या तीन्ही जागा काँग्रेसकडे आहेत.

काँग्रेसला जागा वाढीची संधी

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मताधिक्य २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये कमी झाले. गेल्या साडेतीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज असून नागरिक नाराज आहेत. लोकांची कामे होत नसल्याची तक्रार खुद्द सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक करत असतात. जनतेची ही नाराजी कोणत्या दिशेने जाईल, यावरून या प्रभागातील नगरसेवकांची संख्या ठरेल.