पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
तत्कालीन भाजप सरकारने राज्यावर कर्जाचे डोंगर उभे केले आहे. आज ते सहा लाख कोटींवर पोहोचले आहे. हे कर्ज राज्याच्या उत्पन्नाच्या टक्केवारीपेक्षा अधिक असल्याने अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केली.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी अडचणीत असल्याने त्यांना मदत देणे आवश्यक आहे. परंतु, ही मदत राज्याच्या अवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी सोबत येत केंद्र सरकारकडे जाऊन या नुकसानीच्या तीव्रतेची माहिती सांगून वाढीव मदतीची मागणी केंद्राकडे लावून धरायला हवी. परंतु विरोधक हे ऐकायलाच तयार नाहीत. केवळ गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज प्रभावित करण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. आजतर त्यांची मुख्यमत्र्यांपुढे बॅनर झळकवण्यापर्यंत मजल गेली. हा प्रकार निंदनीय आहे. विरोधकांनीही सरकारची आर्थिक परिस्थिती जाणून घ्यायला हवी. आघाडी सरकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार दिलासा देणार असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.