नागपूर : इतर पक्षातील नेत्यांना भाजप प्रवेश करण्याच्या प्रयत्नात पक्षातील निष्ठावंतांकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा स्फोट होऊ लागला आहे. पक्षासाठी रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार पक्ष करणार आहे किंवा नाही ? असा सवाल करणारे पत्र उमरेडचे भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले आहे.उमरेड मतदारसंघात सध्या भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे व काँग्रेस,शिवसेना असा प्रवास करून भाजपमध्ये प्रवेशकर्ते झालेले माजी आमदार राजू पारवे यांच्यातील राजकीय वाद आता शिगेला पोहचला आहे.
भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत राजू पारवे यांच्या समर्थकांना झुकते माप दिल्याने सुधीर पारवे संतापले आहेत.पक्षासाठी रांत्रदिवस घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या छातीवर बाहेरून आलेल्यांना बसवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षात नवीन लोकाांना पक्ष प्रवेश देताना जुन्या कार्यकर्त्याचा विचार करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. मी माझ्यासह सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राव्दारे कळविल्या आहे, असे सुधीरपारवे म्हणाले. पक्षाची शिस्त म्हणून कार्यकर्ते त्यांच्या भावना सार्वजनिकपणे बोलून दाखवत नाही, मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आणि पक्षाचा दहा वर्ष आमदार राहिलो आहे. त्यामुळे भावना मांडल्या,असे पारवे म्हणाले.
सुधीर पारवे हे भाजपकडून उमरेड मतदारसंघातून २००९ व २०१४ मध्ये विजयी झाले होते. २०१९ मध्ये त्यांचा काँग्रेसचे राजू पारवे यांनी पराभव केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राजू पारवे काँग्रेससोडून शिवसेना शिंदे ग टात गेले व या पक्षाकडून त्यांनी रामटेक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली व पराभूत झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजू पारवे शिवसेना सोडून भाजपमध्ये गेले. त्यांच्या पक्ष प्रवेशाला सुधीर पारवे यांचा विरोध होता. पण त्याची दखल घेतल्या गेली नाही. राजू पारवे यांनाच उमरेडची भाजपची उमेदवारी मिळेल,अशी तेव्हा चर्चा होती. पण अखेरच्या क्षणी सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्यात आली.पण त्यांचा काँग्रे्सचे संजय मेश्राम यांनी पराभव केला. त्यामुळे सध्या उमरेड विधानसभा मतदारसंघात राजकीय वर्चस्वासाठी पारवे विरुद्ध पारवे असा वाद पेटला आहे.