भाजप, शिवसेना आणि रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष यांच्या महायुतीने गेल्या काही निवडणुका राज्यात लढविल्या. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने उपराजधानीत जागा वाढवून देण्याची मागणी केल्यामुळे पुन्हा नवे संकट निर्माण झाले आहे.

भाजपकडे इच्छुक उमेदवारांची संख्या बघता मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा सुरू झाली आहे. रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र येऊन रिपब्लिक फ्रंट तयार झाला असला तरी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे समर्थक असलेले कार्यकर्ते बरेच आहेत. शिवसेनेसोबत युती करण्याची चर्चा सुरू असताना आठवले गटाने गेल्यावर्षीप्रमाणे केवळ ६ जागांची मागणी केली होती. मात्र, युती संपुष्टात येताच त्यांनी २० जागांची मागणी केली आहे आणि निवड समितीचे प्रमुख अनिल सोले यांच्याकडे यादी दिली आहे. प्रत्येक प्रभागात एका जागेसाठी किमान २० ते ३० अर्ज आले आहेत. आठवलेंच्या रिपब्लिकन गटाला उत्तर नागपूरसह दक्षिण आणि पश्चिम नागपुरात उमेदवारी हवी आहे. शिवसेना स्वतंत्र लढणार असल्यामुळे आता शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवासाठी रिपब्लिकन पक्षाला हाताशी घेण्याबाबत भाजपसमोर पर्याय राहिला नाही. मोठय़ा प्रमाणात दलित व्होट बँक शहरात असल्यामुळे रिपब्लिकन पक्षामुळे भाजपाला फायदा होऊ शकतो त्यामुळे त्यांना जागा वाढवून द्याव्या की नाही याबाबत पक्षामध्ये चर्चा सुरू झाली आहे. रिपब्लिकन पक्ष मात्र वाढीव जागांवर ठाम असून कमी जागा दिल्या तर विचार करावा लागेल असा इशारा दिला आहे.

भाजपसोबत युती करणार -सुलेखा कुंभारे

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बहुजन रिपब्लिकन एकता मंच भारतीय जनता पक्षासोबत युती करणार असून पक्षाकडे २० जागांची मागणी करणार असल्याची माहिती संयोजिका  आणि माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कामठी येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये कमळ चिन्ह वापरल्यामुळे पराभव पत्कारावा लागल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन रिपब्लिकन एकचा मंच कुठले चिन्ह वापरणार याकडे सवार्ंचे लक्ष लागले असताना या संदर्भात मात्र अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.  रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे, अशी अनेकांची इच्छा आहे आणि त्यासाठी प्रयत्न केले. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर अहंकारी असून त्यांच्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य होऊ शकत नाही, असा आरोप कुंभारे यांनी केला.

घोळ चर्चेतून सुटेल

या संदर्भात रिपाइंचे राजन वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, गेल्या वेळी शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पक्ष अशी महायुती झाली होती. मात्र, यावेळी शिवसेना बाहेर पडल्यावर वाढीव जागांची मागणी केली आहे. पक्षाकडे २४ प्रभागातून ३२७ इच्छुकांचे अर्ज आले असताना त्यातील अनेक इच्छुक सक्षम उमेदवार आहेत. शिवाय भाजपचे अनेक उमेदवार निवडून येण्यास मदत होईल. या संदर्भात भाजपच्या नेत्यांशी पक्षश्रेष्ठींची चर्चा झाली आहे. पक्षाची अखिल भारतीय बैठक बंगळुरूला होणार आहे. त्यामुळे सर्व वरिष्ठ नेते येणार असल्यामुळे त्याठिकाणी राज्यात भाजपसोबत युती आणि जागा वाटपाबाबत चर्चा होईल. रिपब्लिकन पक्ष आठवले गट भाजपसोबत राहणार आहे. त्यामुळे वाढीव जागा वाटपाबाबतचा घोळ चर्चेतून सुटेल, असा विश्वास आहे.