गडचिरोली : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तथा ‘आरजेडी’चे नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोली पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. भाजपचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी ही तक्रार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ‘एक्स’वर आक्षेपार्ह टीका करून सामाजात तेढ निर्माण करण्याचा यादव यांनी प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यादव यांनी पंतप्रधानांविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. यामुळे देशातील नागरिकांमध्ये अस्वस्थता, संभ्रम आणि संताप पसरू शकतो, असे डॉ. नरोटे यांनी तक्रारीत नमूद केले. त्यांनी संबंधित पोस्टची लिंक तसेच स्क्रीनशॉटही पोलिसांना सादर केले. काही समाजविरोधी प्रवृत्तीकडून राजकीय हेतू साद्य करण्यासाठी देशातील सामाजिक सौहार्द, शांतता व सुरक्षिततेला बाधा आणण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर डागळली जात आहे.
गडचिरोली शहरातील काही युवक आणि कार्यकर्त्यांनी हे ट्विट त्यांच्यापर्यंत पोहचवले. त्यांनी ते वाचल्यावर हे लक्षात आले की, हे ट्विट केवळ राजकीय टीका नसून, पंतप्रधानांच्या आडून थेट देशालाच लक्ष्य केले जात आहे. विशेषतः गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागात अशा प्रकारचे प्रचार हे शांततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात.
“देशात धार्मिक, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव टिकून राहावा म्हणून आपण सातत्याने प्रयत्नशील असतो. परंतु, काही व्यक्ती आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण करत आहेत. याचे परिणाम सामान्य जनतेच्या सुरक्षेवर होऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी आमदार नरोटे यांनी केली.
तक्रारीमध्ये डॉ. नरोटेंनी असेही नमूद केले आहे की, या प्रकारामुळे युवकांमध्ये मानसिक गोंधळ निर्माण झाला असून, गडचिरोली शहरात काही भागांत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युवांना देशविरोधी मानसिकतेच्या आहारी नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
या तक्रारीत त्यांनी ट्विटरवरील संबंधित लिंकही पोलिसांना सादर केली असून त्या माध्यमातून कोणत्या भावना पसरवल्या जात आहेत, हे स्पष्ट होते. पोलिसांनी या ट्विटचा सखोल तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि देशातील शांततेसाठी योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन आमदार नरोटे यांनी केले आहे.