नागपूर : सलग चारवेळा वाढत्या मताधिक्याने विधानसभा निवडणूक जिंकणारे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचे महापालिका निवडणुकीतीही वर्चस्व कायम असल्याचे दिसून येते. २०१७ च्या निवडणुकीत पूर्व नागपूरमधून भाजपने २९ पैकी २४ जागा जिंकून हे सिद्ध केले होते. त्यामुळे काँग्रेससह इतर पक्षांना यावेळी अधिक जोर लावावा लागणार आहे.
पूर्व विधानसभा मतदारसंघात १० प्रभागांचा समावेश आहे. त्यापैकी काही प्रभाग उत्तर, मध्य आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचा भाग आहेत. प्रभाग क्रमांक २१, २३, २४,२५,२६ आणि २७ या प्रभागाचे शंभर टक्के क्षेत्र पूर्व नागपुरातील आहे. केवळ पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रफळाचा विचार केल्यास येथे २९ नगरसेवक आहेत. त्यापैकी तब्बल २४ नगरसेवक भाजपचे आहेत.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये उत्तर आणि पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचा अर्धा भाग आहे. यातील दोन नगरसेवक पूर्व आणि दोन नगरसेवक उत्तरमधील आहेत. पूर्व नागपुरातील दोन्ही नगरसेवक भाजपचे आहेत. प्रभाग क्रमांक ५ मध्ये केवळ एक नगरसेवक पूर्व नागपुरातील आहे. तो देखील भाजपचा आहे. प्रभाग क्रमांक २१ मध्ये दोन भाजप, एक काँग्रेस आणि एक अपक्ष नगरसेवक आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील बहुतांश भाग मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील आहे. येथील केवळ एक नगरसेवक पूर्व नागपुरातून येतो. येथे नगरसेवक भाजपचाच आहे. प्रभाग क्रमांक २३ मध्ये तीन नगरसेवक भाजपचे आहेत. एक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चा आहे. प्रभाग २४ मध्ये चारही नगरसेवक भाजपचे आहेत. प्रभाग क्रमांक २५ मध्ये तीन भाजप आणि एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. तसेच प्रभाग २६ मध्ये चारही नगरसेवक भाजपचे आहेत. प्रभाग २७ मध्ये तीन भाजप आणि एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. प्रभाग क्रमांक २८ मधील बहुतांश भाग दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात येतो. येथे केवळ एक पूर्व नागपुरातील नगरसेवक असून तोही भाजपचा आहे.
आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभा निवडणुकीत सातत्याने मताधिक्य वाढवले आहे. त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १ लाख ३ हजार ९९२ मते तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांनी ७९ हजार ९७५ मते घेतली होती. २०२४ मध्ये खोपडे यांचे पुन्हा मताधिक्य वाढले. त्यांनी १ लाख ६३ हजार ३९० मते प्राप्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) दुनेश्वर पेठे यांना ४८ हजार १०२ मते, अपक्ष पुरुषोत्तम हजारे ११ हजार ३५९ आणि अपक्ष आभा पांडे यांना ९ हजार ४०२ मते मिळाली होती. ही पार्श्वभूमी बघता पूर्व नागपुरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांना अधिक परिश्रम करावे लागणार आहेत.
२०१७ मध्ये पूर्व नागपुरातील स्थिती
प्रभाग जागा -भाजप – काँग्रेस- इतर
४ : ०२ ०२ -००- ००
५ : ०१ ०१ -००- ००
२१ : ०४ ०२ -०१- ०१
२२ : ०१ ०१ -००- ००
२३ : ०४ ०३ -००- ०१
२४ : ०४ ०४ -००- ००
२५ : ०४ ०३ -०१- ००
२६ : ०४ ०४ -००- ००
२७ : ०४ ०३ -०१- ००
२८ : ०१ ०१ -००- ००
एकूण २९ २४ -०३- ०२