अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नागपुरात ‘महाएल्गार’ आंदोलन पुकारणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अचलपूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
बच्चू कडूंनी सत्तेच्या काळात मंत्रिपदाचा गैरवापर करून अमरावती जिल्ह्यात टुमदार बंगला, फार्म हाऊस, कारखाना उभारल्याचा आणि मुंबई, नागपूरसह इतरही शहरांमध्ये मालमत्ता गोळा केल्याचा आरोप प्रवीण तायडे यांनी केला आहे. त्यांच्या संपूर्ण मालमत्तांची चौकशी करावी, अशी मागणी प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बच्चू कडू यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यांनी आपली ईडीमार्फत चौकशी करावी, वाटल्यास मला तुरूंगात डांबावे, असे प्रत्युत्तर दिले आहे.
बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी मालमत्ता गोळा केली. प्रशस्त बंगला, फार्म हाऊस, जलतरण तलाव, एक कारखाना ही मालमत्ता त्यांच्याकडून कुठून आली याची चौकशी झाली पाहिजे, असे प्रवीण तायडे यांचे म्हणणे आहे. ज्या लोकांच्या नावाने ही मालमत्ता गोळा करण्यात आली, त्यांचीही चौकशी करावी, असे प्रवीण तायडे यांनी सांगितले.
प्रवीण तायडे यांनी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव केला. ते बच्चू कडू यांच्यावर सातत्याने आरोप करीत आहेत. त्यात आता या नव्या आरोपांची भर पडली आहे. गेल्या वर्षाअखेरीस बहिरम यात्रेदरम्यान देखील बच्चू कडू आणि प्रवीण तायडे यांच्यात वादाची ठिगणी उडाली होती. दोघांमध्ये आरोप, प्रत्यारोप झाले.
आरोप फेटाळले
दरम्यान, बच्चू कडू यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या विरोधकांचे टीका करण्याचे, आरोप करण्याचे कामच आहे. त्यांनी आपले काम करीत रहावे, पण, जनतेला सर्वकाही माहित आहे. राज्यात भाजपची सत्ता आहे. भाजपने आपल्या सर्व मालमत्तांची चौकशी करावी, ‘ईडी’मार्फत चौकशी करावी, असे आव्हान बच्चू कडू यांनी दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी पुकारलेले आंदोलन चर्चेत आहे. ‘आमदारांना कापा’ असे वादग्रस्त वक्तव्य बच्चू कडू यांनी काही दिवसांपुर्वी केले होते, त्यावरही प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यांनी आपल्या घरी येऊन दाखवावे, असे आव्हान देखील त्यांनी दिले होते. बच्चू कडू यांना आताच शेतकऱ्यांचा कळवळा कसा आला, सत्तेत असताना ते कुठे होते, असा सवाल तायडे यांनी केला.
