बुलढाणा : मागील १८ ऑगस्ट रोजी चिखली शहर व तालुक्याला अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला. ग्रामीण भागांत पांढरदेवसह अन्य गावांना ढगफुटीसदृश्य पावसाने झोडपले. नदी-नाले एक झाल्याने पिकांची अतोनात नासाडी झाली. चिखली शहरात अनेक घरात पाणी शिरल्याने गृहापयोगी साहित्याचे नुकसान झाले. निसर्गाच्या या तांडवाने हजारो शहरी व ग्रामीण भागातील रहिवाशांच्या डोळ्यात अश्रूचा महापूर साचला.
मात्र यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले पाटील या विदेशात (इंग्लंड)मध्ये होत्या. त्यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी समाज माध्यमावर (इंस्टाग्राम)वर संदेश टाकला.
काय होता संदेश?
चिखलीवासीयांवर आलेल्या संकटात आम्ही खंबीरपणे सोबत आहोत. चिखलीवर मोठे संकट आले. या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, त्याचा एकत्रित मुकाबला करू, असा मजकूर या संदेशात होता. जिल्हाधिकारी व चिखली तहसीलदार यांना सरसकट पंचनामे करण्याचे सांगितले असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी सांगितले.
उंटावरून शेळ्या
मतदारसंघवासीयांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ टाकण्यात आला होता. मात्र, याचे स्वागत होण्याऐवजी त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला. खास करून सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका नेटकऱ्याने, हा तर उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार असल्याची जहाल टीका केली. अशाच संतप्त प्रतिक्रियानी सोशल मीडियावर मागील दोन दिवसांपासून गाजत आहे. ‘तुम्ही विदेशात फिरा…,’ ते ‘आम्ही पण तुम्हाला रेकॉर्डिंग करून मतदान करू’, ‘विदेशात जाऊन संदेश देणे योग्य नाही ताईसाहेब’, असे सल्लेदेखील काहींनी दिले. चिखलीमध्ये खूप विकास झाला हे दिसले, असा ‘ऑनलाइन’ सूर अनेकांनी आळवला.
हा हवाई संदेश आणि त्यावरील टीकेच्या फैऱ्या अजूनही गाजत आहेत. चिखलीच्या आमदार भारतात व चिखलीत येईपर्यंत हा सोशल मीडियावरील धडाका सुरूच राहणार, असे सध्याचे चित्र आहे.
६३,२१४ हे.वरील पिकांचे नुकसान
चिखली तालुक्यात अतिवृष्टीने ६३,२१४ हे.वरील पिकांचे नुकसान झाले असून एक लाखांहून अधिक शेतकरी बाधित झाले. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असून, तालुक्यात एकूण ६३,२१४ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. एक लाख दोन हजार ८३२ शेतकरी या आपत्तीमुळे बाधित झालेत. तब्बल १५० गावांना फटका बसला. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतात पाणी साचले, ज्यामुळे उभी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली. काही ठिकाणी शेतातील माती आणि पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.