नागपूर : अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीतर्फे प्रस्तावित दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह भाजपच्या दोन आमदारांनीही कडाडून विरोध केला आहे. आमदार समीर मेघे आणि डॉ. आशीष देशमुख या दोघांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नागपूर कार्यालयाला पत्र देत ‘या प्रकल्पाला मंजुरी देऊन आमच्या धरतीमातेसह आमचे जिवंतपणी शवविच्छेदन करू नका’, अशी विनंती केली आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबुजा सिमेंट्स लि. यांच्या दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पासंदर्भात पर्यावरणीय जनसुनावणी बुधवारी (१० सप्टेंबर) आयोजित केली आहे. या प्रकल्पाला स्थानिकांसह भाजपचे हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे आणि सावनेरचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी विरोध केला आहे. भाजपच्या दोन्ही आमदारांनी प्रदूषण मंडळाला दिलेल्या पत्रात म्हटले की, या प्रकल्पामुळे परिसरातील १० गावांसह तेथील शेतकरी, नागरिक, पशुधनासह पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. नागरिकांवर रोग व आजारांचे संकट, विस्थापन, जीवाला धोका, उपजीविकेचे साधन हिरावले जाण्याची भीती आहे.
प्रदूषण मंडळाने बुधवारी सकाळी ११.३० वाजता, प्रकल्प स्थळी, अंबुजा सिमेंट्स लि., दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण, ख. नं. ९०, वलनी, ता. नागपूर (ग्रामीण) येथे जनसुनावणी आयोजित केल्याची सूचना प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित केली. या सुनावणीला स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनी उपस्थित राहून मत मांडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आता जनसूनवणीत या प्रकल्पाच्या समर्थनार्थ आणि विरोधात कोण बाजू मांडणार?, त्याबाबत काय युक्तिवाद केला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाची सद्यस्थिती काय ?
दहेगाव गोवारी येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १ दशलक्ष टन असून, त्याचा विस्तार सुमारे १ हजार ५६२ हेक्टर परिसरात आहे. या प्रकल्पाचा परिणाम गोवारी, सिंदी, खैरी, टोंडा खैरी, बोरगाव खुर्द, बेलोरी, झुनकी, वलनी, खांडाला, पारडी आदी गावांवर होण्याची शक्यता आहे.
आमदार समीर मेघे यांचे म्हणणे काय ?
दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह आमचाही तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाबाबतच्या सुनावणीत प्रकल्पाची सखोल माहिती घेऊन विरोध दर्शवला जाईल, अशी माहिती हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.