चंद्रपूर:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. अशातच तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सेवा सहकारी संस्थेच्या काही सदस्यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी प्रकाश देवतळे यांच्यासह भाजपच्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. तर याच प्रकरणात देवतळे यांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लवकरच होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा येथे सेवा सहकारी संस्था आहेत. या सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून देवाडाचे सरपंच विलाव मोगरकर यांचे नाव जिल्हा बँकेत प्रतिनिधी म्हणून बिनविरोध पाठविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

दरम्यान याच सेवा सहकारी संस्थेकडून बँकेत प्रतिनिधी पाठवावे यासाठी काही महिन्यांपूर्वीच कॉग्रेस पक्षातून भाजपात दाखल झालेले प्रकाश देवतळे हे देखील इच्छुक होते. मात्र सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांनी त्यांचे नाव पाठविले नाही. त्यामुळे देवतळे चांगलेच संतापले.

दरम्यान मोगरकर यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड झाल्यानंतर देवाडा येथील १२ सदस्यांना घेवून तेलंगना राज्यातील करीमनगर येथे सहलीला गेले होते. याची माहिती देवतळे यांना मिळाली, तेव्हा देवतळे बुधवारी करीमनगर येथे गेले. एका हॉटेलात १२ सदस्य जेवणाचा आनंद घेत असतांनाच देवतळे तिथे काही लोकांना घेवून दाखल झाले. यावेळी देवतळे व सहकाऱ्यांनी १२ सदस्यांना मारहाण करित जबरदस्तीने स्वत:च्या वाहनात बसवून अज्ञात स्थळी घेवून गेले.

मारहाण झालेल्या सदस्यांनी पेट्रोलिंग करणाऱ्या तेलंगणा पोलिसांना त्यांच्या सोबत घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली आणि मदतीची विनंती केली. मोगरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी देवतळे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वांना बाँड पेपरवर सोडण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा गावात तणावाची स्थिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेनंतर प्रकाश देवतळे व काही भाजप पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेवून निवेदन दिले. तसेच पोलीसांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती केल्याची माहिती आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक सुदर्शन यांना विचारणा केली असता देवतळे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन दिल्याचे सांगितले. देवतळे यांना विचारले असता, त्यांनी याला दुजोरा दिला.