नागपूर : मशिदींवरील भोंगे हटवणे, हनुमान चालिसासारखे मुद्दे उपस्थित करण्यासाठी काहींना सुपारी देण्यात आली असून त्याद्वारे महाराष्ट्र अस्थिर करण्याचा आणि राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव भाजपचा आहे, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आंनदराज आंबेडकर यांनी केला.
आंबेडकर आज रविभवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. भोंग्याचा वाद दुर्दैवी आहे. संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला पाहिजे. परंतु काहींना सुपारी देऊन राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजपचा हा सर्व खटाटोप सुरू आहे. संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. लोकांनी आपले धार्मिक विधी घरात करायला हवे. आज देशात महागाई, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना धार्मिक मुद्दे उपस्थित करून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. त्याऐवजी या भोंग्याचा उपयोग महागाई, बेरोजगारीविरोधात आवाज उठवण्यासाठी केला पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळायला हवी. पाण्याअभावी पीक करपत आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी त्यांना विजेची गरज आहे. सरकारने तातडीने त्याकडे लक्ष द्यावे, गरज पडल्यास उद्योगांची वीज कमी करावी, असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे, महासचिव प्रा. युवराज धसवाडीकर, सचिव भैया भालेराव, भूषण भस्मे, धर्मपाल वंजारी, शरद दंढाळे, नीलेश खडसन, मनीष रंगारी, राजू मेश्राम, सुरेंद्र मस्के अरिवद कारेमोरे उपस्थित होते.
आंबेडकर स्मारकासाठी आंदोलन
पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार करण्याचा निर्णय २५ वर्षांपूर्वी घेण्यात आला. परंतु अद्याप ते उभारण्यात आले नाही, हे दुर्दैव आहे. तीन महिन्यात जागा न दिल्यास आंदोलन करू, असा इशारा त्यांनी. अंबाझरी उद्यानात आंबेडकर भवन तयार करण्याची मागणीही त्यांनी केली.
पावसाळय़ात निवडणुका अशक्य
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण गेले. सरकारच्या चुकीमुळे त्यांना आरक्षण मिळणार नाही. ओबीसींना आरक्षणासाठी लढा उभारावा लागेल. परंतु जातीपातीत विखुरल्यामुळे ओबीसी एकसंघ नाही. याचा फटका त्यांना बसत आहे. पावसाळय़ात निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळय़ानंतरच निवडणुका होतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ploy impose presidential state allegation anandraj ambedkar mosques amy
First published on: 05-05-2022 at 00:33 IST