चंद्रपूर : भाजपची महानगर कार्यकारिणी गठित होताच राजीनामा सत्राला सुरुवात झाली आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे कट्टर समर्थक राजेंद्र अडपेवार यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्ष विकास खटी आणि राहुल घोटेकर यांनी उपाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. आता माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार समर्थक राजीव गोलीवार यांनीही उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वाढदिवसाला अनुपस्थित राहिल्याने महानगर अध्यक्षांनी कारणे दाखवा नोटीस बजावली, तथा कार्यकर्त्यांना वेठबिगार वागणूक दिली जात असून दुसऱ्या पक्षांतून आलेल्यांना महत्त्वाची पदे दिली जात असल्याचा आरोप गोलीवार यांनी केला आहे.

भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्याची नवीन प्रथा सुरू झाली आहे. सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नसल्याने अनेक कार्यकर्ते दुखावले आहेत. इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांकडून हा प्रकार सुरू आहे. त्याला काही जेष्ठ नेत्यांचे पाठबळ आहे, असा आरोप गोलीवार यांनी केला आहे.गोलीवार यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार मुनगंटीवार तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष अहीर यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, आम्ही गेल्या ३५ वर्षांपासून पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. आता एखाद्याच्या वाढदिवसाला गेलो नाही म्हणून नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले जात आहे. मागील काही वर्षांत जुन्या कार्यकर्त्यांचा सातत्याने अपमान केला जात आहे. बाहेरून आलेल्यांना महत्त्वाची पदे दिली जात आहेत. यामुळे जुने कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.

गोलीवार यांच्या राजीनाम्यामुळे पक्षांतर्गत कलह आणखी वाढण्याची शक्यता आहे. आणखी काहीजण राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार दिवं. बाळू धानोरकर यांचा प्रचार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अहीर त्यांच्यावर नाराज आहेत. आता त्यांचीच महानगर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने भाजपमध्ये नाराजीनाट्य बघायला मिळत आहे. नियुक्त्या करताना अहीर, मुनगंटीवार यांना विश्वासात घेतले गेले नाही, अशीही चर्चा आहे. महामंत्रीपदी बाहेरून आलेल्यांना तसेच यंग चांदा ब्रिगेडमधून आलेल्यांना संधी दिली गेल्याने नाराजीत भर पडली आहे.