वर्धा : पालिका निवडणुकीत शक्यतो युती करा, नं झाल्यास मैत्रीपूर्ण लढा, एकमेकांवर कठोर टीका टाळा, असे सल्ले भाजप, शिंदे सेना व अजित पवार गटाने आपल्या समर्थकांना पूर्वीच दिले. पण हे सल्ले मनावर घ्यायला एकही मित्रवर्य तयार नसल्याच्या घडामोडी दिसू लागल्या आहेत. प्रत्येकास आपली ताकद दाखविण्याची खुमखूमी लागल्याचे चित्र आहे. मोठा बंधू भाजप तर अजिबात ऐकायला तयार नसल्याचे मित्र पक्षाचे नेते हताश होत बोलू लागले आहे. त्यामुळे एकला चलो रे हा पंथ मित्रांनी स्वीकारला. तीन विरुद्ध तीन अशी लढतीची प्राथमिक चिन्हे आहेत.
भाजप हा राज्यात मोठा तर वर्धा जिल्ह्यात ज्येष्ठ व वरिष्ठ बंधू म्हणून वागत असल्याचे म्हटल्या जाते. त्यात चूक पण नाही. एक मंत्री, चार आमदार व निवडणूक प्रमुख माजी खासदार रामदास तडस यांच्यासारखा राजकीय जादूगर. पुन्हा यशाची चकाकदार पाटी. मावळत्या काळात सहाही पालिकेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहले. आता केंद्रात राज्यात सत्ता व जिल्ह्यात मंत्रिपद. वाटा द्यायचाच कशाला, असा भाजप पदाधिकाऱ्यांचा नेत्यांवर दबाव. म्हणूनच शिंदे सेनेचे बडे नेते रविकांत बालपांडे हे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांच्याकडे वाटाघाटी करण्यास गेले आणि रिक्त हस्ते परतले.
सुईच्या टोकावर बसतील एव्हडे पण देवू शकणार नाही, असा नाईलाजवजा सूर बालपांडे यांना ऐकावा लागला. बालपांडे म्हणतात की पालकमंत्री भोयर यांनी जागा सोडण्यास असमर्थता व्यक्त केली. परिणामी आम्ही स्वतंत्र लढणार. मी स्वतः वर्धा पालिका अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रभागात सेनेचे उमेदवार उभे राहतील. शिंदे सेना काय, हे आता दाखवूनच देणार, असा आत्मविश्वास बालपांडे व्यक्त करतात. ही ताजी घडामोड महायुतीत आलबेल नसल्याचे स्पष्ट करणारी. रविकांत बालपांडे हे कट्टर शिवसैनिक. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद लाभलेले व त्यांच्याच सूचनेने विधानसभा निवडणूक लढलेले.
पण पुढे निष्टेची कसोटी लागूनही ते उद्धव ठाकरे यांच्याच सोबत राहले. पण ईथे वाईट अनुभव आल्याने त्यांना सोडल्याचे वक्तव्य त्यांनी केले. एकनाथ शिंदे यांच्याशी जूना स्नेह होताच. म्हणून त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यावर प्रताप सरनाईक म्हणून गेले की रविबाबू उशीर केला हो यायला. वर्ध्यातील हा प्रसंग पाहणारे बालपांडे यांच्याशी सहानुभूती ठेवून आहेत. म्हणूनच शिंदे सेनेत गेल्यावर ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी थेट संपर्कात राहू लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्ध्यात आले आणि बालपांडे घरी भेट देऊन गेले. कट्टर काँग्रेस विरोधाचे सूत्र घेऊन राजकारण करणाऱ्या बालपांडे यांना आता मित्र भाजपचेच आव्हान स्वीकारायचे आहे. पालिका निवडणुकीचा त्यांना खासा अनुभव आहे.
