वर्धा : राज्यात नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी अधूनमधून होत असते. नवा जिल्हा हा प्रशासकीय सोयीचा ठरतो, असा मुख्य युक्तीवाद त्यामागे असतो. पण शासन लगेच त्यासाठी तयार होत नाही कारण जिल्हा निर्मितीमुळे वाढणारा खर्च. पण भाजप या संघटनाप्रेमी पक्षास त्याची तमा नाही.महाराष्ट्रात ३६ जिल्हे असल्याची शासकीय नोंद पण भाजप मात्र ८० जिल्हे असल्याचे संघटना पातळीवार मानते.
राज्यात भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड झाली. मात्र काही जिल्ह्यात अद्याप नव्या अध्यक्षांची निवड झालेली नाही. भाजपच्या संघटनात्मक ८० जिल्ह्यापैकी ५८ जिल्ह्यात नवे अध्यक्ष निवडल्या गेलेत. अजून २२ जिल्ह्याचे अध्यक्ष नेमने बाकी असल्याचे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. यावर्षी आणखी दोन जिल्ह्याची निर्मिती विदर्भात झाली आहे. एक काटोल तर दुसरा अचलपूर – मेळघाट. राज्यातील अन्य भागात पण भाजपने जिल्हा निर्मिती केली असल्याचे सांगण्यात आले.
या संघटनात्मक बाबीवर नुकतीच चर्चा आटोपली. विदर्भात वर्धा, चंद्रपूर शहर व ग्रामीण तसेच गडचिरोली या चार जिल्ह्यात नवे अध्यक्ष नेमणे बाकी आहेत. पक्षांतर्गत कुरघोडी हे त्यामागचे कारण असल्याची चर्चा होते. राज्यात जे जिल्हे अद्याप बाकी आहेत त्या ठिकाणी जुनेच कायम करायचे की नवे चेहरे द्यायचे, असा तिढा आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार. त्याची जबाबदारी झेपेल, असा चेहरा असला पाहिजे. सर्वांना सांभाळून घेणारी व्यक्ती हवी, असा सूर उमटतो. तसेच जातीय किनार पण आहेच.
गत कार्यकाळात विदर्भात तेली समाजाचा एकही जिल्हाध्यक्ष निवडल्या नं गेल्याने जाहीर नाराजी व्यक्त झाली होती. आता पण तेली समाज संघटना याबाबतीत संवेदनशील असल्याचे दिसून आले. त्यात चुकीचे काय, असा सवाल माजी खासदार रामदास तडस करतात व अधिक बोलायचे टाळतात. वर्धा जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष सुनील गफाट यांना बहुतांश नेते व गटांचे समर्थन असल्याचे म्हटल्या जाते. पण बदल करायचा असेल तर याला घ्या, असे तंत्र नेते मांडतात. तेली समाजातून पुढे आलेले भाजप नेते अग्रेसर आहेत. माजी जि. प. सभापती मिलिंद भेंडे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे व माजी शहराध्यक्ष प्रशांत बुरले यांचा अध्यक्षपदावर दावा आहे. तेली समाजाच्या या नेत्यांना त्यांचे समर्थक बडे नेते पुढे करीत असल्याचे दिसून येते. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस तसेच सुमित वानखेडे, दादाराव केचे, राजेश बकाने व समीर कुणावार हे चार आमदार मर्जीतील अध्यक्ष व्हावा म्हणून प्रयत्नशील असल्याच्या घडामोडी आहेत.