कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार; देखरेख करणारी यंत्रणाच नाही

नागपूर : दरवर्षी शाळा, महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर  होणारा मुद्रांकाचा तुटवडा यंदाही निर्माण झाला असून या संधीचा फायदा घेत विक्रेते चढय़ादराने त्याची विक्री करीत असल्याच्या तक्रारी आहेत. १०० रुपयांचा मुद्रांक ४०० ते ५०० रुपयांना विकला जात असल्याची माहिती आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील तहसील कार्यालयात मुद्रांक विक्री केली जाते. त्यासाठी विक्रेत्यांना  परवाने देण्यात आले असून कोषागार कार्यालयाकडून त्यांना मुद्रांक पुरवठा केला जातो. तो करताना कोणाला किती मुद्रांक दिले जाते याची नोंद केली जाते. मात्र विक्रेते ते निर्धारित दराने विकतात की कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार करतात यावर देखरेख करणारी यंत्रणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नाही. त्यामुळे विक्रेत्यांचे फावले आहे.  दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवाय घरखरेदी, कर्ज आणि तत्सम कामासाठीही मुद्रांकाची गरज भासते. विविध दाखल्यांसाठी तसेच न्यायालयीन कामांसाठी मुद्रांकाची गरज भासत असल्याने मागणी वाढली आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, क्रिमीलेअर, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी १०० रुपयांपासून ५०० रुपयांच्या मुद्रांकाची गरज भासते. गरजूंची निकड लक्षात घेऊन विक्रेते कृत्रिम तुटवडा निर्माण करतात. तहसील कार्यालय परिसरात सध्या १०० रुपयांचे मुद्रांक २०० से ५०० रुपये अशा चढय़ादराने विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही विक्रेते ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेऊन दुसऱ्या दिवशी मुद्रांक देतात. यात अनेक दलाल सक्रिय झाले आहेत.

विविध प्रमाणपत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन आठवडे ते एक महिना असा कालावधी निर्धारित केला आहे. पण दलालांच्या माध्यमातून तात्काळ प्रमाणपत्र तयार करणारे विक्रेत्यांकडून चढय़ादराने मुद्रांक खरेदी करत असल्याचेही दिसून आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत सर्व सामान्य गरजू नागरिकांना मात्र मुद्रांक प्राप्त करण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

यासंदर्भात मुद्रांक उपनियंत्रक प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

केवळ एक तास विक्री

विक्रेते केवळ सकाळी एक तासच विक्री करतात. काही विक्रेते मोजके मुद्रांक विक्री करून इतर मुद्रांक साठवून ठेवतात व त्यांच्या ‘ठरलेल्या’ ग्राहकांना चढय़ा दराने विकतात. मात्र याही परिस्थितीत काही मुद्रांक विक्रेते प्रामाणिकपणे त्यांना मिळालेल्या सर्व मुद्रांकोंची विक्री निर्धारित दराने करतात. काही विक्रेते आधार कार्ड पाहून त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांना एक किंवा दोनच मुद्रांक देतात. मात्र असे विक्रेते बोटावर मोजण्या इतकेच आहेत.