लोकसत्‍ता टीम

मरावती : बालगृहातून नुकत्‍याच सुटलेल्‍या मुलाची हत्‍या करून मृतदेह येथील गडगडेश्‍वर मंदिर परिसरात फेकल्‍याची घटना सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली. साहिल मनीष चोपडा उर्फ पंजाबी (१७, रा. अंबा कॉलनी) असे मृताचे नाव आहे. गेल्‍या वीस दिवसांतील हत्‍येची ही सातवी घटना असल्‍याने शहरात खळबळ उडाली आहे.

खोलापुरी गटे पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील गडगडेश्‍वर मंदिरामागे एका युवकाची हत्‍या करण्‍यात आल्‍याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्‍थळी पोहचला. परिसराची पाहणी केल्‍यानंतर मंदिरामागे रक्‍ताच्‍या थारोळ्यात साहिलचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्‍या शेजारी आढळलेला चायना चाकू पोलिसांनी जप्‍त केला. साहिलची हत्‍या कुणी केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

आणखी वाचा-प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल

साहिल पंजाबी याचा दोन ते तीन महिन्‍यांपुर्वी एका युवकासोबत वाद झाला होता. दोन्‍ही गटातील युवकांनी हा वाद मिटवण्‍यासाठी राजापेठ परिसरात एक बैठक घेतली होती. पण, त्यावेळीही पुन्‍हा वाद उफाळून आला आणि साहिलने एका युवकावर चाकूने वार केला होता. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी साहिल याला ताब्‍यात घेऊन बालसुधारगृहात ठेवले होते. साहिल हा नुकताच बालसुधारगृहातून बाहेर पडला होता. सोमवारी रात्री त्‍याची हत्‍या करण्‍यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहिलची पूर्ववैमनस्‍यातून हत्‍या करण्‍यात आल्‍याचा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे. गेल्‍या १५ ऑक्‍टोबर रोजी चित्रा चौक परिसरात १०० रुपये मागितल्यावर केवळ २० रुपयेच दिल्याने उद्भवलेल्या वादात दोन आरोपींनी एका तरुणाची चाकू व लोखंडी हुकने हल्ला चढवून हत्या केली होती. त्‍यामुळे लोकांमध्‍ये रोष पसरला होता. आरोपींवर कठोर कारवाई व्‍हावी, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्‍यावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले होते. निशांत उर्फ गोलू उशरेटे (३०, रा. मसानगंज) या युवकाच्‍या हत्‍येप्रकरणी कोतवाली पोलिसांनी मारेकरी विक्की गुप्ता (३५) रा. रतनगंज व योगेश गरूड (३०) रा. विलासनगर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. गोलूचा केश कर्तनाचा व्‍यवसाय होता. त्‍याने काही दिवसांपूर्वी कावड यात्रा काढण्‍यातही पुढाकार घेतला होता.

आणखी वाचा-नागपूर: ‘नो राईट टर्न’मुळे नागपूरकर हैराण

पूर्ववैमनस्‍यातून अल्‍पवयीन मुलांनी चाकूने हत्‍या केल्‍याच्‍या घटना यापूर्वीही घडल्‍या आहेत. पोलिसांनी गस्‍त वाढवली आहे. बंदोबस्‍त वाढवला आहे, तरीही हत्‍यासत्र सुरूच आहे. त्‍यामुळे पोलिसांसमोर गुन्‍हेगारी रोखण्‍याचे आव्‍हान आहे