अकोला : आयुष्य क्षणभंगुर असते. अहमदाबादमधील विमान अपघात प्रकरणावरून याचा अनुभव आला. अहमदाबाद येथील भीषण अपघातानंतर सर्वत्र हाहाकार माजला. अकोट येथील दाऊलाल भंडारी यांची नात व डॉ. चंचल भंडारी यांची अडीच वर्षांची चिमुकली परिसरातील एका इमारतीत अडकली होती. त्या इमारतीला देखील आग लागल्याने चिमुकलीचा जीव धोक्यात आला. त्या अडीच वर्षीय चिमुकलीचा सांभाळ करणाऱ्या मदतनीस महिलेने समय सूचकता दाखवत उंच इमारतीवरून चिमुकलीला खाली टाकले व स्वतः देखील उडी मारली. या दोघींनाही खालच्या लोकांनी अलगद झेलत त्यांचा जीव वाचवला. मदनीस महिलेच्या सतर्कतेने चिमुकलीचा जीव वाचल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
आनंदी आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रवाशांना घेऊन अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने उड्डाण घेतलेले विमान अवघ्या काही अंतरावर जात इमारतीवर कोसळले. १२ जूनला झालेल्या एअर इंडिया विमानाच्या या अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच ज्याठिकाणी विमान कोसळले तिथे स्फोट होऊन काहींचा मृत्यू झाला. ही संख्या आता ३३ वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे. या विमान अपघात प्रकरणामुळे भारतासह संपूर्ण जग हादरले आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी दाऊलाल भंडारी यांची मुलगी डॉ. चंचल भंडारी या अहमदाबाद येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. अपघाताच्या वेळी त्या रुग्णालयात सेवा देत होत्या. घरी त्यांची अडीच वर्षांची मुलगी मदतनीस सांभाळत होती.
अचानक विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातामुळे मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले. प्रचंड आवाज, आगीचे लोळ अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली. विमानाचा स्फोट होऊन परिसरात आग लागली. या आगीत डॉ. चंचल भंडारी यांचे घरही सापडले. त्या परिस्थितीपुढे खचून न जाता मदतनीस महिलेने मोठ्या धैर्याने परिस्थितीचा सामना केला. आपल्या हातातील चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी काळजावर दगड ठेऊन तिने चिमुकलीला उंचावरून खाली टाकले. स्वतःही उडी घेतली. खाली उभ्या असलेल्या नागरिकांनी दोघींनाही अलगद झेलले. त्यामुळे दोघींचा देखील जीव वाचला. आगीच्या विळख्यात सापडलेले घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. मात्र, संकटातून चिमुकली सुखरूप वाचल्याने कुटुंबीयांना मोठे समाधान लाभले.