अमरावती : पोळा सणाच्या दिवशी शुक्रवारी सकाळी बडनेरा येथील जुनी वस्‍ती पवार वाडी परिसरात एका ५० वर्षीय वरिष्ठ लिपिकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने शहर हादरले. अतुल ज्ञानदेव पुरी असे मृताचे नाव आहे. ते अमरावती शहरातील पुंडलिक बाबा नगर येथील रहिवासी होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीन संचालित नांदुरा रेल्वे येथील पुंडलिक महाराज महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल पुरी हे दररोज ड्युटीवर जाण्यासाठी दुचाकीने बडनेरा रेल्वेस्थानकावर येत होते. स्टँडवर दुचाकी ठेवून ते रेल्वेने नांदुरा येथे ये-जा करीत होते. आज नेहमीप्रमाणे ते रेल्वेस्थानकावर पोहचत असताना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पवार वाडी, जुनी वस्ती परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यांचा जागीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली, श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलावले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली. हत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या सात महिन्यांत एकूण २१ हत्यांची नोंद झाली असून हत्येचा प्रयत्न या शीर्षाखाली एकूण २३ प्रथम माहिती अहवाल नोंदविण्यात आले आहेत. २ जानेवारी रोजी भीमटेकडी मार्गावरील भोवते ले-आऊटमध्ये पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घरात दडवून ठेवत पती पसार झाला होता. या वर्षातील पहिल्या हत्येची नोंद झाली. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी तपोवन परिसरात एका तरूणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२३ फेब्रुवारी रोजी रहाटगाव येथील फार्म हाऊसमध्ये पती-पत्नीचा मृत्यू आढळून आला होता. २ मार्च रोजी मसानगंज परिसरात एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती, तर मार्चमध्येच एका कुख्यात गुन्हेगाराची हत्या करण्यात आली होती.

गेल्या जून महिन्यात सहायक पोलीस निरीक्षक अब्दूल कलाम अब्दूल कादर यांची हत्या करण्यात आली, या घटनेने शहर हादरले होते. अब्दूल कलाम हे वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते ड्युटीवर जात असताना कारमधून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिली, नंतर त्यांच्यावर शस्त्राने वार करण्यात आले होते. २ ऑगस्टला एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती.