यवतमाळ : गावात भाईगिरी करणाऱ्या तरूणावर जुन्या वादातून दोघांनी तलवार व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री उशिरा यवतमाळ नजीक वाघाडी या गावात घडली.
महेश नरेश कोल्हेकर (३२, रा. चापडोह) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी उमेश शिरभाते (१९) व रोशन राऊत (२५, दोघे रा. वाघाडी) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश कोल्हेकर हा गेल्या तीन-चार वर्षांपासून वाघाडी येथे एका महिला मित्रासोबत राहत होता. शिंदे यांच्या शेतात सोकारी म्हणून काम करणारा महेश दारूच्या आहारी गेला होता. काही महिन्यांपूर्वी दारुच्या नशेत त्याने उमेश शिरभाते यांच्या आजीला मारहाण केली होती.
या प्रकारामुळे उमेश व महेशमध्ये वाद झाला होता. मात्र, तो तात्पुरता मिटलेला होता. गावात भाईगिरी करून लोकांना धमकावत असल्याने त्याच्याबद्दल गावकऱ्यांत संताप होता. सोमवारी रात्री महेश गावात आला व दुर्गा देवीच्या ओट्यावर बसून होता. यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते. रात्री साडेनऊच्या सुमारास महेशवर उमेश व रोशन या दोघांनी अचानक तलवार व कोयत्याने हल्ला केला.
यावेळी रोशन राऊत व उमेश शिरभाते या दोघांनी मिळून महेशच्या डोक्यावर, छातीवर, पोटावर आणि चेहऱ्यावर सपासप वार करत त्याला रक्तबंबाळ केले. ही घटना महेशसोबत राहत असलेल्या सिताबाई बोरकर यांच्या आईने प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी अवस्थेतील महेशला स्थानिक नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सिताबाई बोरकर हिने पोलिसात तक्रार दिल्यानंतर यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम राबवून दोन्ही आरोपींना मोहा येथून अटक केली. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल नाईक अधिक तपास करत आहेत.
दररोज सरासरी एक खून
जिल्ह्यात खून व इतर घटनांत सातत्याने वाढ होत आहे. दररोज सरासरी एक खून होत असल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे. कौटुंबिक कारणासह जुने वाद, पैशांचे व्यवहार, अनैतिक संबंध, व्यसनाधिनता अशा कारणांमुळे थेट हत्या करण्याचे प्रकार वाढल्याने पोलिसह चक्रावले आहेत. खून केला तरी तीन महिन्यात बाहेर येवू, असा समज आरोपींच्या डोक्यात पक्का झाल्याने वाद किंवा अन्य कारणातून खूनाचा ट्रेंड यवतमाळ जिल्ह्यात रूजल्याचे निरीक्षण येथील काही मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे. यवतमाळला गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.