नागपूर : विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपूरमध्ये काँग्रेस सातत्याने बाजी मारत असली तरी बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस यांच्यात धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होत असल्याने महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकावर राहत असल्याचे दिसून येते.

राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर महापालिका प्रशासनाने प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केली आहे. ही रचना २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत जशी होती, तशीच आहे. त्यात केवळ नाममात्र बदल करण्यात आले आहेत. प्रशासनाने सूचना व हरकती मागवल्या आहेत. परंतु आधीचा अनुभव बघता प्रारूप प्रभागरचनाच अंतिम होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक याच प्रभागरचनेच्या आधार होईल, अशी शक्यता आहे. शहरात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात ३८ प्रभाग आहेत आणि १५१ नगरसेवक असणार आहेत.

उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील नारा येथून प्रभागरचनेला प्रारंभ झाला आहे. या विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक १,२, ३, ४, ५, ६, ७ आणि ९ असे एकूण आठ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभाग चार सदस्यीय असल्याने या मतदारसंघातून ३२ नगरसेवक निवडून येतात. येथे २०१४चा अपवाद वगळता विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सातत्याने विजयी पताका फडकवत आहे. मात्र, महापालिका निवडणुकीची आकडेवारी बघता येथे भाजप नगरसेवकांची संख्या सर्वाधिक आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे १७ तर बसपचे १० नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेस सात नगरसेवकांसह तिसऱ्या क्रमांकावर होती. याचा अर्थ उत्तर नागपुरातील धर्मनिरपेक्ष मते निर्णायक भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट होते. विधानसभा निवडणुकीत ही मते एकगठ्ठा काँग्रेसकडे वळतात. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ती बसप आणि काँग्रेसमध्ये विभागली जातात. त्यात काँग्रेसपेक्षा बसपला अधिक लाभ होतो. भाजपची मते विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महापालिका निवडणुकीत देखील भाजपच्याच बाजूने राहत असल्याने नगरसेवकांची संख्या अधिक असते. मात्र, बसप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या एकत्रित केल्यास भाजपच्या नगरसेवकांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. आता पुन्हा २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना आहे. मात्र मतदारांची संख्या वाढली आहे. या वाढीव मतदारांवर बरेच काही अवलंबून असेल. हे सर्वपक्षीय मतदार असल्याचे गृहीत धरल्यास उत्तर नागपुरात महापालिका निवडणुकीचे चित्र काय असेल, हे आता सांगता येणार नाही.

२०१७ मध्ये उत्तर नागपुरातील पक्षीय बलाबल

प्रभाग क्र. जागा भाजप – बसप- काँग्रेस

१ : ०४ ०४ -००- ००

२ : ०४ ०० -००- ०४

३ : ०४ ०३ -००- ०१

४ : ०४ ०४ -००- ००

५ : ०४ ०४ -००- ००

६ : ०४ ०० -०४- ००

७ : ०४ ०० -०३- ०१

९ : ०४ ०० -०३- ०१

एकूण ३२ १५ १० ०७