बुलढाणा : ग्रामीण भागातील रहिवासी, घरची जेमतेम परिस्थिती, धाडसी खेळाचा वारसा नाही की त्यासाठी लागणाऱ्या उच्च प्रशिक्षणाची कमतरता व साहित्याची कमतरता अशी प्रतिकूल परिस्थिती. मात्र, ‘ती’ अधिकच सक्षम ठरली. पिता आणि गुरु अशा दोन्ही भूमिका निभाविणाऱ्या कणखर व्यक्तीने तिला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या प्रबळ केले. तिला लहानपणापासून आपल्या पद्धतीने प्रशिक्षित करून जिद्ध, परिश्रम, कठोर सराव आणि यशाचा कानमंत्र दिला. यामुळे जेमतेम नऊ वर्षांच्या अल्प वयात तिने अनेक शिखरे गाठली. कडे, डोंगर आणि शिखरे यावर लिलया बागडण्यात ती यशस्वी ठरली. या ‘बाल लीला’ ची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली.

ही जिद्धीची यशोगाथा आहे ती बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक गावातील विठ्ठल सोनुने आणि त्यांची पराक्रमी नऊ वर्षीय कन्या सिद्धी सोनुने यांची. भल्याभल्याना गिर्यारोहण, ‘रॅपलिंग’ हा काय प्रकार आहे यांची यतकिंचितही माहिती नाही. मात्र, साखळी गावातील या जिजाऊ कन्येने अल्पवयात यशाची मोठी शिखरे गाठली आहे. बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील ४थी मध्ये शिकणाऱ्या सिद्धी विठ्ठल सोनुने हिने आपल्या पराक्रम रुपी शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

केवळ नवव्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील खडतर असा साडेतीनशे फूट खोल असलेल्या शितकडा या धबधब्यात रॅपलिंग करून विक्रम केला आहे. मोठ्या व्यक्तीसाठी देखील अतिशय खोल असलेल्या या धबधब्यात रॅपलिंग करणे आव्हानात्मक ठरते. मात्र आपले गुरुतुल्य वडील विठ्ठल सोनुने यांच्या मार्गदर्शना खाली तिने असाध्य ते साध्य केले. हे करताना घनदाट जंगलातून ३ किलोमीटर पायवाट सहजपणे तुडविली. त्यामुळे ती सिद्धी की जिद्धी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यापूर्वी वयाच्या जेमतेम सातव्या वर्षी सिद्धी सोनुने हिने महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर असलेले कळसुबाई चे शिखर पादाक्रांत करण्याचा भीम पराक्रम केला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने हे शिखर गाठले हे तिचे वेगळेपण. त्यानंतर १८०० फूट खोल कोकणकड्यावरून रॅपलिंग करत आणखी एक विक्रम केला होता. तिच्या धाडसी कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने देखील दखल घेतली आहे.

तिच्या या धाडसाबद्दल हिमॉर्डिल ट्रेक अॅडव्हेंचर संस्थेने तिला ‘सह्याद्रीची हिरकणी’ ही उपाधी बहाल केली आहे. सिद्धीने या आधी मागील २६ जानेवारी २०२५ रोजी हिमालयातील १२हजार ५०० फूट उंचीचा केदारकंठा कडा सर केला तिथे तिने भारताचा तिरंगा फडकावला होता.

आर्थिक पाठबळ देण्याची गरज

सिद्धीच्या या धाडसी कामगिरी बद्दल तिच्यावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. मात्र केवळ कौतुकाने भागणार नाही. तिच्या कामागिरीला शाब्दिक सलाम करूनच भागणार नाही. जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, संस्था, विविध पक्षीय नेते, पदाधिकारी, पतसंस्था यांनी तिला आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. उच्च प्रशिक्षण, उच्च दर्जाचे आधुनिक साहित्य यासाठी मदत करणे, तिला शिक्षणासाठी दत्तक घेण्याची गरज आहे. असे झाले तर कितीतरी यशो शिखरे ती गाठू शकते हे तेवढेच खरे.