बुलढाणा : दानशूरता, दातृत्व, दिलदारपणा हे शब्द आजकालच्या संगणक युगात आणि स्वार्थी, व्यावहारिक युगात जवळपास हद्दपार झाले आहे. रक्ताचे नाते असलेलेसुद्धा अडीअडचणीत मदत करीत नाही, असे सध्याचे विदारक चित्र आहे.

या भीषण पार्श्वभूमीवर मेहकर मतदारसंघातील शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार आणि आपल्या पित्याचा सामाजिक कार्याचा वारसा चालविणाऱ्या ॲड. माधुरी पवार याला अपवाद ठरल्या आहेत. अनोळखी , निराधार लोकांना मायेची सावली देणारे या जगात फार कमी लोक आहेत. मात्र पितापुत्रीने नुकतेच दातृत्व दाखवून एक आदर्श ठेवला आहे.

त्यांनी आपल्या देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून मेहकर तालुक्यातील बोथा येथील वयोवृद्ध आजी आणि तिच्या नातवंडाना मदत करुन हक्काचे घर दिले आहे. दुर्गम भागातील बोथा येथे ते वास्तव्यास आहे.

७५ वर्षीय निराधार शोभा भालेराव या आजीसह चार नातींसह एका पडक्या घरात राहत होते. घरातील कर्ते पुरुष दगावलेले, त्यामुळे गरीब आजीच चार नातींचा सांभाळ करतात. पवार पिता पुत्रीने पदरमोड करून त्यांना हक्काचे घर बांधून दिले. एवढेच नव्हे तर त्यांना भांडीकुंडी व वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्यही घेऊन दिले. या घराचा गृहप्रवेश सोहळा तालुक्यातील बोथा या दुर्गम गावी काल थाटामाटात पार पाडला. याप्रसंगी उपस्थितांच्या डोळ्यातून आपसूकच आश्रू तरळतांना दिसले.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा ते मेहकर रोडवरील सिध्दांता आश्रमपासून दोन किलोमीटर अंतरावरील आडवळणावर असलेले बोथा हे तस दुर्गम गांव आहे. याच गावात ७५ वर्षीय निराधार शोभा भालेराव आजी आपल्या चिमुकल्या चार नातीसह राहतात. अठरा विश्व् दारिद्र्य पिच्छा सोडायला तयार नसतानाच, नातींचे मातृपितृछत्रही हरवलेले. त्यामुळे ७५ वर्षीय शोभा भालेराव आजी छातीचा कोट करून परिस्थितीशी चार हात करत असून स्वतःसह नातींचे पालनपोषण करते.

याची माहिती येथील संवेदनशील शिक्षक अमित शिंगणे यांना झाली. त्यांनी या कुटुंबाशी संपर्क साधत तब्बल तीन वर्षापासून कोणत्या ना कोणत्या प्रकारे या कुटुंबाच्या मदतीसाठी हात पुढे ठेवला.शोभा आजीला घरकुल मिळाले होते, परंतु धो धो पावसात ते वाहून गेल्याने त्या दहा बाय दहाच्या छोट्या पडक्या घरात वास्तव्य करीत होत्या, असे शिक्षक अमित शिंगणे यांनी सांगितले. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार व देवानंद पवार फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड. माधुरी पवार यांना त्यांनी दिली. अॅड. माधुरी पवार यांनी शिक्षक अमित शिंगणे यांच्यासह या निराधार कुटुंबाची भेट घेतली. तातडीने सूत्र हलवत त्यांनी आठ दिवसांत टिन शेडच्या टुमदार दोन खोल्या त्यांना बांधून दिल्या.

एवढेच नव्हे तर त्यांना वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य, यासोबतच गादी, पलंग, पंखा, आरसा, कंगवा यासह अन्य नित्यपयोगी सर्व साहित्यदेखील घेऊन दिले. या नवीन घरात त्या चार अनाथ मुलीच्या वडिलांचा व आजोबाचा फोटो लावण्यात आला.त्यावेळी थोडी समज असलेल्या चार मुली पैकी मोठी मुलगी ज्योती हिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्यामुळे उपस्थित सर्वांचेच
डोळे आनंदाश्रूनी आणि मन भरून आले.या घराचा गृहप्रवेश सोहळा बोथा येथे थाटामाटात पार पडला. यावेळी मेहकरचे शिवसेना उबाठा आमदार सिद्धार्थ खरात यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, या भालेराव कुटुंबाला शासनस्तरावरून काय मदत करता येईल, याबाबत संबंधितांशी बोलतो असे सांगितले हे सांगताना त्यांनादेखील गहिवरून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्याम उमाळकर, माजी सभापती नंदकिशोर बोरे, ज्येष्ठ काँग्रेस नेते लक्ष्मण घुमरे, आशीष राहाटे हजर होते. या सर्वांनी मार्गदर्शनपर मनोगतातून देवानंद पवार व अॅड. माधुरी पवार यांच्या सामाजिक उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. प्रास्ताविकातून अॅड. माधुरी पवार यांनी शोभा भालेराव कूटूंबाच्या व्यथा सांगून, देवानंद पवार फाऊंडेशनने यासाठी खारीचा वाटा उचलला असल्याचे सांगितले.पुढे या चार चिमुकल्याना शिक्षण देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवीला. गावात फक्त चौथी पर्यंत शाळा आहे. या चार मधील मोठी मुलगी ज्योती ही आता पाचव्या वर्गात शिक्षण घेत आहे.पुढील शिक्षण देण्यासाठी तत्पर असल्याचे माधुरी पवार यांनी सांगितले. मात्र समाजातील दानशूर व्यक्ती, संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी देखील पुढाकार घेत मदतीचे हात पुढे करावे , असे आवाहन केले.