बुलढाणा : येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात अभूतपूर्व निकालाची नोंद झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. मेहरे यांनी हा निकाल दिला असून न्यायालयात साक्ष फिरवणाऱ्यांना जरब बसवणारा हा निकाल ठरला आहे.

एखाद्या प्रकरणात साक्षीदार फितूर होणे, नवीन नाही. मात्र शारीरिक अत्याचारासारख्या गंभीर घटनेतील पीडित महिला मुख्य आरोपीविरुद्ध साक्ष फिरवत फितूर झाल्याचे स्पष्ट झाले. याची गंभीर दखल घेत न्यायाधीशांनी पुराव्याअभावी आरोपीला निर्दोष सोडले. मात्र साक्ष फिरवणाऱ्या बलात्कार पीडितेविरोधात त्यांनी स्वतः फिर्याद दाखल केली. एवढेच नव्हे तर तिला दोन महिने कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावून धडा शिकवला.

काय होते प्रकरण?

मागील ५ ऑगस्ट २०२० रोजी या गंभीर घटनाक्रमाला सुरुवात झाली. चिखली तालुक्यातील किन्हीनाईक येथील २७ वर्षीय विवाहितेने अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती परगावी गेले असताना पतीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. शेवटी तिने पोलिसांत आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी तिचा आणि साक्षीदारांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करीत तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

हेही वाचा – वाशीम : सार्वजनिक बांधकाम विभागातील तो कॅरम बोर्ड कुणासाठी? कर्मचारी म्हणतात..

अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन. मेहरे यांच्या न्यायालयात सदर प्रकरण चालले. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. संतोष खत्री यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. मात्र पीडितेने आपली साक्ष फिरवली. न्यायालयाने २२ डिसेंबर २०२२ रोजी आरोपीची निर्दोष सुटका केली. हा निकाल देतानाच न्यायाधीश आर.एन. मेहरे यांनी विवाहितेविरोधात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३४४ नुसार वेगळी कार्यवाही करण्याचे मत नोंदवले होते. यानंतर न्यायाधीश मेहरे यांनी स्वतः किरकोळ फौजदारी अर्ज क्र. ६/२०२३ नुसार त्या महिलेविरोधात त्यांच्याच न्यायालयात ई-फायलिंगच्या माध्यमातून दाखल केला. या प्रकरणामध्ये सरकार पक्षालाही समाविष्ट करण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. संतोष खत्री यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा – बुलढाणा : शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशकडे जाणारा मार्ग रोखला, वरवट बकाल येथे ‘स्वाभिमानी’चे चक्काजाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदार विवाहितेला नोटीस काढून तिचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र ‘तिने’ वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली नाही व तिचे म्हणणे सादर केले नाही. सरकारी वकील अ‍ॅड. खत्री यांनी युक्तिवादात महिलेने न्यायालयात खोटी साक्ष दिली. तिच्यामुळे संपूर्ण यंत्रणेस कामाला लावण्यात आल्याने कठोर शिक्षेची मागणी केली. न्यायाधीश मेहरे यांनी साक्ष फिरवणाऱ्या विवाहितेस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. कोर्ट पैरवी म्हणून अमडापूर ठाण्याचे हवालदार संजय ताठे यांनी सहकार्य केले.